कल्याण डोंबिवलीत करोनाचा कहर सुरुच आहे. आजची रुग्णसंख्या ५६० झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीत उपचार घेत असलेल्यांची संख्या ४ हजार २६८ आहे. आत्तापर्यंत ३०९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

२९ जून रोजी रोजी ४३५ रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळले होते. तर ३० जून रोजी ४६२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. १ जुलै म्हणजेच बुधवारी ३५० रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळले होते. तर आज ५६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आला आहे. करोनाची साखळी मोडण्यासाठी १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत चार दिवसात जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ते कल्याण डोंबिवलीची स्थिती बिकट होऊ शकते हेच दाखवणारे आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं, तोंडाला मास्क लावावा, हँड सॅनेटायझर आणि हात धुणे सुरु ठेवावे असं आव्हान वारंवार महापालिकेतर्फे करण्यात येतं आहे.