वयाच्या साठीत अमेरिकेच्या २८ राज्यांत फेरफटका

वयाची साठी ओलांडली की निवृत्तीचे वेध लागतात, पण वसईतील एक साठीतला तरुण मात्र सळसळत्या उत्साहात दुचाकीवरून विविध देशांत भ्रंमती करत आहे. नुकतीच त्यांनी अमेरिकेतील २८ राज्ये पालथी घातली. अमेरिकेहून परतताच आता त्यांनी चीनच्या प्रवासाची तयारी सुरू केली आहे.

वसईत राहणाऱ्या सुभाष इनामदार (वय ६२) यांना मोटारसायकलचे वेड. गेल्या दहा वर्षांपासून ते मोटारसायकलीवर भारतभ्रमंती करत होते. मोटारसायकलीवरून भ्रमंती करत नवनवीन समाजजीवन अनुभवणे, विविध भारतीय परंपरा, संस्कृती जाणून घेणे हा त्यांचा आवडता छंद. संपूर्ण भारतभर भ्रंमती केल्यानंतर त्यांना जगातील विविध देशांची भ्रमंती करण्याचे वेध लागले. २०१२मध्ये त्यांनी युरोपमधील १७ देश मोटारसायकलीवर पालथे घातले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेची भ्रंमती करण्याचा निर्णय घेतला.

साडेचार महिन्यांचा अमेरिकेतील सुमारे २४ हजार किलोमीरचा प्रवास त्यांनी मोटारसायकलीने पूर्ण केला. नुकतेच ते वसईला परतले आहेत. त्यांनी तेथील प्रवासाच्या रोमांचकारी आठवणी आणि अनुभव कथन केले. ‘‘एखादा प्रदेश जर आपल्याला माहीत असेल तर तो नव्याने पाहण्यात मजा नसते, त्यामुळे मी अमेरिका मोहीम एकटय़ाने करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासासाठी त्यांनी बजाज अव्हेंजर ही मोटारसायकल नेली होती. विशेष म्हणजे या मोटारसायकलचा क्रमांक भारतीय होता,’’ असे त्यांनी सांगितले.

नेवार्क बंदरात त्यांनी मोटारसायकल विमानातून आणली होती. पण त्यांच्या मोटारसायकलीच्या वायर उंदरांनी कुरतडल्याचे आढळून आले. त्यामुळे १४ किलोमीटर मोटारसायकल ढकलत नेऊन त्यांनी ती दुरुस्त करून घेतली. हा प्रवास कठीण असल्याची पहिलीच चाहूल त्यांना मिळाली. पण न डगमगता त्यांनी प्रवास सुरू केला. अलास्कात तापमान ३ ते ४ डिग्री अंश सेल्सिअस असायचे तर नेवाडा वाळवंटात तापमान ४८ अंश सेल्सिअस असायचे, पण तरी विषम वातावरणात त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. रात्री ते जंगलात मुक्काम करायचे. त्यासाठी तंबू उभारायचे आणि जंगली श्वापदापासून रक्षण करण्यासाठी कॅम्पफायर लावायचे. स्वयंपाकाचा शिधा ते सोबत बाळगायचे आणि तंबूतच स्वयंपाक करायचे. त्यांच्या सामानाचे वजनच २५ किलोच्या आसपास असायचे. अमेरिकन पोलिसांनी आणि तेथील जनतेने खूप चांगले सहकार्य केल्याचेही इनामदार म्हणाले.