भारताला स्वातंत्र्य मिळून आता पुढील ऑगस्ट महिन्यात ६८ वर्षे पूर्ण होतील. एवढय़ा वर्षांत देशात विकासाच्या अनेक वाटा उजळल्या असल्या तरी मुंबईपासून ७० किलोमीटर अंतरावरील वाघिणीच्या वाडीसारख्या डोंगरातील वाडय़ांवर प्रकाशाचा किरणही पडलेला नाही. रस्ते नाहीत, वीज नाहीत, प्राथमिक सुविधा नाहीत आणि शेती करावी तर जमीनही वनखात्याच्या मालकीची अशा अवस्थेत येथील साडेतीनशे जणांची लोकवस्ती पारतंत्र्याचे जिणे जगत आहे.
बदलापूरच्या पुढे पुण्याच्या दिशेकडचे रेल्वेस्थानक असणाऱ्या वांगणीपासून पाच किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर वाघिणीची वाडी आहे. वांगणी हे अंबरनाथ तालुक्यात येते. येथून जवळच असलेली बेडीस वाडी व पुढे डोंगरात अध्र्या तास चालल्यावर येणारी वाघिणीची वाडी रायगड जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यात आहेत. या वाडीची लोकसंख्या ३५० असून येथे ५० घरे आहेत.
येथून खूप दूर असलेल्या शेलू ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वाडीत चौथीपर्यंत शाळा असून तीन शिक्षक दररोज येथे डोंगर चढून येऊन मुलांना शिकवतात. या वाडीत अद्याप वीजच पोहचलेली नाही. येथील अनेक जण खाली वांगणी-बदलापूरमध्ये दररोज कामांसाठी जातात. ग्रामस्थांकडे मोबाइल आहेत, मात्र ते चार्ज करण्यासाठी त्यांना खालच्या बेडीस वाडीत यावे लागते. ‘जमीन वनखात्याच्या मालकीची असल्याने शेतीही करता येत नाही, त्यामुळे शहरात जावे लागते, अशावेळी मोबाइलची गरज भासते,’ असे येथील ग्रामस्थ बाळू वाघ याने सांगितले.  पन्नाशीला आलो तरी, घरात वीज आलेली नाही. आमच्या वाडीतील वृद्ध मंडळी विजेची वाट पाहूनच मरण पावले. पण सरकारला जाग आलेली नाही, असे रामा सावशीद यांनी सांगितले.
सोलार दिवे निकामी
संपूर्ण वाडीत ग्रामपंचायतीकडून फक्त चार सोलार दिवे बसविण्यात आले असून ते पावसाळ्यात खराब होऊन जातात. तसेच या दिव्यांची दुरुस्ती होत नाही व याचा प्रकाश कमी पडत असल्याने प्रकाश नसलेलाच बरा वाटतो. रोटरी क्लबने येथे येऊन काही घरांना सोलार पॅनेल दिली होती, ज्यात एक दिवा लागू शकेल. परंतु, यातील बहुतांश निकामी झाले असून पावसामुळे खराब झाले आहेत. असे विनोद धुमना या तरुणाने सांगितले. तसेच चार महिन्यांपूर्वी महावितरण वीज कंपनीची माणसे येथील सर्वेक्षण करून गेली असून संपूर्ण वाडीपर्यंत वीज पोहचविण्यासाठी ६० खांब लागतील असे आम्हाला सांगितले असून त्या कामासाठी संपूर्ण वाडीतील लोक मदतीसाठी तयार झाले आहेत. मात्र अद्याप पुढच्या कामाचा पत्ता नाही असे धुमना म्हणाला.

लोकप्रतिनिधी गप्प तर प्रशासनाचे दुर्लक्ष
कर्जत तालुक्यातील माणगाव वाडी, भडवळ वाडी, ठाकूरवाडी आदी डोंगरात असणाऱ्या वाडय़ांमध्ये वीज पोहचलेली असून वाघिणीची वाडी येथे मात्र वीज पोहचविण्यात अपयश आले आहे. याचे खापर येथील मंडळी राजकीय पुढाऱ्यांवर फोडत असून प्रशासनानेही अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे समजते आहे. मतदानासाठी बोलवतात, पण आमची कामे होत नाहीत, असे या ग्रामस्थांनी सांगितले. या वाडीतून ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्व करणारा सध्या एकही सदस्य नसल्याने या ग्रामस्थांच्या आवाजाला वाचा फोडणारा कोणीच नसल्याने येथील ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

मी कर्जत कार्यालयात ३ महिन्यापूर्वीच रुजू झालो असून मी, कार्यभार स्वीकारताच या वाडीवर वीज पोहचविण्यासाठीचे सर्वेक्षण केले असून याबाबतचा प्रस्ताव आमच्या पेण येथील कार्यालयातून रायगड जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला आहे. त्यामुळे येथे वीज पोहचविण्याचे प्रयत्न चालू आहेत.
 -बालाजी वाघमोडे, उप-कार्यकारी अभियंता, कर्जत