९० चाळी, ११ गोडाऊन्सवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठाण्यातील तळोजे-शिळफाटा येथील जमिनींवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून तेथे चाळी आणि गोदामे बांधणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई केली. या परिसरातील ९० चाळी आणि ११ गोदामे प्रशासनाच्या वतीने पाडण्यात आली. त्यामुळे स्थानिकांनी बुधवारी मोकळा श्वास घेतला.

तळोजे-शिळ रस्त्यावर पिंपरी हे गाव असून हे गाव सातारा जिल्ह्य़ातील कोयना धरणामुळे बाधित झालेल्या विस्थापितांचे येथे पुनर्वसन झाले आहे. येथील ठाकूरपाडा भागात मुंब्रा तसेच इतर ठिकाणांहून आलेल्या काही लोकांनी मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. याप्रकरणी स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनी तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आढावा घेऊन तहसीलदारांना या भागात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. या ठिकाणी बांधलेल्या ९० चाळी, ११ गोदामे जमीनदोस्त करण्यात आली. या चाळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या चार एकर जागेवर बांधण्यात आल्या होत्या तर ११ गोदामे आणि अन्य २० बांधकामे ही सहा एकर शासकीय जमिनीवर होती