11 August 2020

News Flash

टाळेबंदीमुळे घरात बसून कंटाळलेल्या अंध मुलांसाठी उपक्रम

मोबाइलच्या समूह संभाषणातून अंध विद्यार्थ्यांच्या पाहुण्यांबरोबर गप्पा

प्रतिनिधिक छायाचित्र

मोबाइलच्या समूह संभाषणातून अंध विद्यार्थ्यांच्या पाहुण्यांबरोबर गप्पा

भगवान मंडलिक, : डोंबिवली : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अनावश्यक घराबाहेर पडणे आणि जमावाने फिरण्यावर कायद्याने बंदी आणली आहे. अशा परिस्थितीत घरात सतत बसून कंटाळलेल्या अंध विद्यार्थ्यांसाठी ठाणे पूर्व येथील रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सीटीतर्फे मोबाइलच्या समूह संभाषणातून (कॉन्फरन्स कॉल) विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन आणि त्यांच्यासोबत गप्पा असा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात दररोज एक ते दीड तास अंध विद्यार्थी सहभागी मान्यवर व्यक्तींकडून त्यांच्या क्षेत्राबद्दल माहिती घेत असून त्यांना विविध प्रश्न विचारत आपला वेळ सत्कार्मी लावत आहेत.

ठाणे पूर्व येथील रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सीटीतर्फे अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य करण्यासाठी एक केंद्र चालविले जाते. अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या केंद्रातर्फे केले जाते. या केंद्रात कर्जत, कसारा, हिंगोली आणि ठाणे परिसरांतील ७५ अंध विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. करोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने यापूर्वीच मुलांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.

एरवी केंद्रात अभ्यास आणि नावीन्यपूर्ण उपक्रमात रमून दिवस जात असल्याने विद्यार्थी आनंदात असतात. मात्र, करोनामुळे घरी गेल्यापासून विरंगुळा म्हणून दुसरे काही साधन नसल्याने मुले कंटाळली आहे. या मुलांना घरात बसून कंटाळा येऊ नये तसेच त्यांना सतत बोलते ठेवून ताजेतवाने ठेवण्यासाठी रोटरी क्लब ठाणे लेक सीटी अंध विद्यार्थी केंद्राच्या समन्वयक वृषाली वैद्य आणि त्यांच्या सहकारी प्रिया करंजे यांनी तातडीने मोबाइल समूह संभाषणाच्या (कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून अभिनय, माध्यम, शिक्षण, कला आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे मुले आनंदी झाली आहेत.

उपक्रम असा आहे..

केंद्रातील ७५ विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक संभाषणाच्या सत्रात १४ अंध विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. कोणत्या दिवशी कोण मान्यवर व्यक्ती मुलांसोबत संपर्क साधणार आहे, याची माहिती समूह संभाषणात सहभागी होणाऱ्या १४ अंध विद्यार्थ्यांना दिली जाते. दुपारी ३ वाजता हे संभाषण आयोजित केले जाते. मान्यवर व्यक्ती या संभाषणात भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सहभागी झाली की, त्यांची ओळख संवादाच्या सूत्रसंचालक वृषाली वैद्य करून देतात. या वेळी चर्चा कोणत्या विषयावर होणार आहे आणि संभाषणात सहभागी झालेली व्यक्ती कोणत्या क्षेत्रातील आहे याची माहिती मुलांना दिली जाते. त्याप्रमाणे विद्यार्थी स्वत: काही प्रश्न सहभागी पाहुण्याला विचारण्यासाठी काढून ठेवतात. आतापर्यंत अभिनय क्षेत्रातील स्पृहा जोशी, विशाखा सुभेदार, माध्यम समूहातील मिलिंद भागवत, सायली जोशी आणि इतर पाहुणे सहभागी झाले आहेत, असे वैद्य यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2020 1:14 am

Web Title: activities for blind children who are tired of sitting at home due to lockdown zws 70
Next Stories
1 चंडिका मातेचा यात्रौत्सव साधेपणाने
2 Coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाइन
3 करोना रुग्णांसाठी पालिकेकडे सोपवलं खासगी हॉस्पिटल, मनसेच्या राजू पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
Just Now!
X