‘डीपी बॉक्स’मुळे पावसाळय़ात दुर्घटनेची भीती

ठाणे : पावसाळय़ापूर्वी वीजसाधनांची देखभाल करण्याची कामे महावितरणकडून सुरू असली तरी ठाण्यातील रस्त्यांलगत असलेल्या उघडय़ा वीजपेटय़ांकडे (डीपी बॉक्स) मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. लोकमान्यनगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट, समतानगर, मासुंदा तलाव परिसरात मोठय़ा प्रमाणात उघडय़ा वीजपेटय़ा आढळून आल्या आहेत. पावसाळय़ात या डीपी बॉक्समध्ये पाणी जाऊन शॉटसर्किट होण्याची किंवा साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरण्याची भीती पादचारी व्यक्त करत आहेत.

ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र या परिसरात विद्युत वाहिन्यांच्या लोखंडी डीपी पेटय़ा या धोकादायक अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. समतानगर येथील समतानगर संकुलासमोरील डीपी हा एका बाजूने झुकला असून तात्पुरत्या स्वरूपात तो दोरीने बांधून ठेवण्यात आला आहे. वंदना डेपो मार्गावरील पदपथाजवळ डीपीचा दरवाजा तुटला असून या ठिकाणी असलेल्या झाडाचे पाणी पावसाळ्यात थेट वीजवाहक यंत्रणेमध्ये शिरत आहे. मासुंदा तलाव येथील गडकरी रंगायतनसमोरील पदपथाजवळ असलेली डीपीही उघडय़ा अवस्थेत आहे. लोकमान्यनगर, यशोधननगर, सावरकरनगर या भागातही महावितरणचे डीपी हे उघडय़ा अवस्थेत पाहायला मिळत आहेत. डीपीच्या पेटीचे पत्रेही निखळून गेले असून वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या डीपींमुळे नागरिकांकडून महावितरणबद्दल रोष व्यक्त करण्यात आला.

जीर्ण सिग्नल खांब

शहरातील अंतर्गत आणि मुख्य मार्गावर असलेले सिग्नल खांब धोकादायक अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले आहे. वंदना आणि खोपट येथील सिग्नल वर्षांनुवर्षे देखभाल-दुरुस्तीशिवाय उभे असून गंजलेल्या खांबांवर फक्त रंगरंगोटीचे कामच करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.