देवेंद्र फडणवीस यांचा दावा; पोलीस दलातील बदल्यांच्या गोंधळातून अविश्वास उघड

आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आणि हे सरकार आम्ही कधीही पाडणार नसल्याचे सांगत अंतर्गत विरोधातूनच हे सरकार पडेल, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

तसेच करोना, इतर महत्त्वाचे प्रश्न आणि सरकारचे अपयश झाकण्यासाठी सरकार पाडण्याचे कपोलोकल्पित लेख लिहून नागरिकांचे लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोप करत, १२ आमदार आणि सरकार हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून राज्यातील १२ कोटी जनता ही महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी ठाणे शहराचा दौरा करून करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या बदल्यांमधील गोंधळामुळे राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावाबरोबरच मुख्यमंत्री-मंत्र्यांमधील अविश्वास उघड झाला आहे. तसेच या सरकारमध्ये कधी मंत्री, कधी सचिव, तर कधी अधिकारी निर्णय जाहीर करतात. काही वेळा मुख्यमंत्र्यांकडून थेट निर्णय घेतले जातात. प्रत्येकजण मीच प्रमुख असल्याच्या आविर्भावात असून यामुळे सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

महात्मा फुले योजनेमधून १ लाख २२ हजार रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही एवढी नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांच्या संख्येबाबत शंका आहे. यानिमित्ताने काही रुग्णालयांकडून रॅकेट चालविले जाते का, याची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

मराठा आरक्षण राजकारणापलीकडे

मराठा आरक्षण हा मुद्दा राजकारणापलीकडे असून तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने सजग राहून प्रयत्न केला पाहिजे. या प्रश्नावर भाजपाच्या वतीने याचिकाकर्ते विनोद पाटील यांना आवश्यक मदत करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सारथी संस्था पद्धतशीरपणे खिळखिळी करून बंद करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्यातील जनता वाढत्या वीज देयकांमुळे हैराण आहे. मात्र, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र शासनाकडे अवास्तव आणि नियमात नसलेल्या मागण्या केल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला.

‘रुग्णसंख्या कमी दाखविण्याचा प्रयत्न’.

करोनामुळे मृत पावण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत एमएमआरडीए क्षेत्रामध्ये ७३ टक्के इतके आहे.  राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात राज्य चाचण्यांमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे. राज्यात रुग्णसंख्या कमी दाखविण्याचा प्रयत्न केला जात असून यातून नागरिकांचे जीव धोक्यात घातला जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे