नव्या वातानुकूलन यंत्रणेला महासभेत मंजुरी

काही महिन्यांपूर्वी आचार्य अत्रे रंगमंदिरात ती फुलराणी’चा प्रयोग सुरूअसताना वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याने रसिकांनी प्रयोग बंद पाडला होता. या प्रकारानंतर पालिका प्रशासनाचे डोळे उघडले असून नाटय़प्रेमींना लवकरच गारवा अनुभवता येणार आहे. कल्याण येथील अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणा बदलण्यात येणार आहे. दोन कोटी १५ लाखांची तरतूद करण्यात आली असून महासभेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

कल्याण आणि डोंबिवली शहरांत प्रत्येकी एक नाटय़गृह आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर हे शहरापासून लांब आहे. शिवाय येथे नाटय़प्रयोगही जास्त प्रमाणात होत नाहीत. त्यामुळे साहजिकच नाटय़रसिक कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिराला जास्त पसंती देतात. मात्र या नाटय़गृहाची अवस्थाही बिकटच असून रसिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी अत्रे नाटय़गृहात ‘ती फुलराणी’ हा नाटय़प्रयोग सुरू असताना वातानुकूलन यंत्रणा बंद पडली. त्यामुळे संतापलेल्या रसिकांनी ‘ती फुलराणी’चा प्रयोग बंद पाडला. रसिकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने याची दखल शहरातील नाटय़संस्था व कलाकारांनी घेत पालिका प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. तसेच पालिका प्रशासनाला दोन्ही नाटय़गृहांची देखभाल-दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत अखेर पालिकेने आचार्य अत्रे नाटय़गृहातील वातानुकूलन यंत्रणा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अत्रे नाटय़गृहात २००० साली

वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली होती. तिचे आयुर्मान हे पंधरा वर्षांचे होते. त्यामुळे ती यंत्रणा तातडीने बदलण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. या प्रस्तावानुसार वातानुकूलन यंत्रणेच्या नवीन तंत्रज्ञानानुसार सुधारणा करणे व ५ वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. पालिकेने कंपनीकडून निविदाही मागविल्या असून एका कंपनीच्या दरपत्रकानुसार देखभाल-दुरुस्ती आणि यंत्रणा यासाठी दोन कोटी १५ लाख ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.