News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनाने जगणे अर्थपूर्ण होते..

माझा कल नाटकाकडे अधिक असल्याने मी सतत नाटकाची पुस्तके वाचत होतो.

आनंद म्हसवेकर, लेखक/ दिग्दर्शक

वाचनाने वैचारिक बैठक तयार होते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे सतत वाचत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आयुष्यात सगळेच अनुभव घेता येणे शक्य नसते. तेव्हा इतरांच्या अनुभवातूनही अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यातून सामाजिक भान निर्माण होते. एखादी कादंबरी मनाला भिडते, कारण लेखकाने त्यात त्याचे जीवनातील अनुभव परिणामकारकपणे मांडलेले असतात. त्यामुळे हे चित्रण अनेकांना आपल्या परिचयाचे, ओळखीचे वाटते. मला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. माझा कल नाटकाकडे अधिक असल्याने मी सतत नाटकाची पुस्तके वाचत होतो. त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वडाळा येथील हॉस्टेलला राहिलो. याच काळात मी दादर सार्वजनिक वाचनालयाचा सभासद झालो. महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांत मी ‘शांकुतल’पासून नाटकाची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकेक करून मी अनेक नाटकांच्या संहिता वाचल्या.

त्यानंतर मुंबई विद्यापीठात मराठी विषयात एम.ए. करताना काय वाचावे आणि कशा पद्धतीने वाचावे याचे उत्तम ज्ञान मिळाले. पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ ही कांदबरी आवडली. मला आत्मचरित्रे वाचायला अधिक आवडतात. कारण त्यात यशस्वी व्यक्तींचा संघर्ष दिसतो. त्यातून बरेच काही शिकता येते. सामाजिक भान असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले यांची चरित्रे मी सुरुवातीच्या काळात वाचली आहेत. विश्राम बेडेकर यांची ‘एक झाड दोन पक्षी’ ही कादंबरीदेखील मला अधिक भावली. सध्या गिरीश कर्नाड यांनी लिहिलेले आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेले ‘खेळता खेळता आयुष्य’ हे पुस्तक वाचत आहे.

श्री. ना. पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’ या पुस्तकांचेही मी वाचन केले आहे. सगळ्यात आवडते लेखक म्हणजे बाळ कोल्हटकर. राम गणेश गडकरी यांच्यानंतर तशी पल्लेदार मराठी भाषाशैली कोल्हटकरांनी वापरली. त्यामुळे मराठी नाटय़विश्व समृद्ध झाले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे छोटा गडकरी म्हणतात. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास या संतांच्या कथा मी अतिशय आवडीने वाचल्या. ज्ञानेश्वरीचा १२वा अध्याय एम.ए.ला असताना अभ्यासाला होता. तेव्हापासून ज्ञानेश्वरी माझ्यासोबत आहे. मी जेव्हा जेव्हा अस्वस्थ होतो, तेव्हा तेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो. त्यामुळे माझ्या मनावरील सारी मरगळ दूर होते. सर्व शंका दूर होऊन मन पुन्हा ताजेतवाने होते. अभिराम भडकमकर यांची ‘अ‍ॅट माय कॉस्ट’ ही कथा मला अतिशय आवडली. माझ्या लिखाणाच्या ओघाने वाचन सुरूच असते. अगदी इसापनीतीतील कथाही मी अजूनही आवर्जून वाचतो. त्यामुळे बालनाटय़ांचे लिखाण करणे सोपे जाते. मन्टोच्या हिंदी कथाही मनाला तितक्याच भावतात. त्याचप्रमाणे तसलिमा नसरीन यांचे लेखनही मनाला भिडते. खरे वाटते. वसुधा सहस्रबुद्धे यांची ‘तप्त सूर्याचा संताप’ ही कांदबरी वाचताना मजा आली होती. अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. जी.ए.ची ‘प्रदक्षिणा’ ही कादंबरी अतिशय छान आहे. राजकीय पुस्तकांमध्ये रमणे पसंत नसले तरी सामाजिक आणि कौटुंबिक विषयात रमणे अधिक आवडते. एखाद्याला गूढ वाचनाची आवड असेल तर त्याने गूढकथा वाचाव्यात. जर एखाद्याला राजकीय वाचनात आवड असेल तर तशी पुस्तके वाचावीत. व्यक्तीनुसार आवडनिवड बदलेल. मात्र वाचन करणे खूप उपयुक्त ठरणार आहे. माझ्या घरी ७००-८०० पुस्तके अगदी सहज आहेत. याशिवाय वाचनालयात जाऊन पुस्तके वाचण्याचा माझा छंद अजूनही कायम आहे. कवितांची पुस्तकेही वाचणे मला आवडते. ज्या व्यक्तीला लिखाण करायचे आहे, त्या व्यक्तीने वाचणे अतिशय गरजेचे आहे. सर्वसमान्यांना ध्यानात घेऊन लिखाण करणे गरजेचे आहे. त्यामुळे लेखनात नेमकेपणा येतो. विचारांना अधिक धार येते. आजही शेक्सपियर वाचणे मला अधिक आवडते. व्हिज्युअल्स तसेच सिनेनाटय़ अशी पुस्तकेही मी वाचतो. या वाचनाचा माझ्या लिखाणात पुरेपूर फायदा होतो. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत वाचणे मी अधिक पसंत करेन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:19 am

Web Title: anand mhasvekar bookshelf
Next Stories
1 फुलपाखरांच्या जगात : पेंटेड सॉ टूथ
2 मुजोर रिक्षाचालकांची तक्रार करायची कुठे?
3 चिंचणीमध्ये लाल मानेच्या फलारोपचे दर्शन
Just Now!
X