News Flash

बदलापूरचा तरुण कानपूरमधून बेपत्ता

२० दिवसांनंतरही शोध सुरूच; पोलीस, प्रशासनाचा असहकार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

२० दिवसांनंतरही शोध सुरूच; पोलीस, प्रशासनाचा असहकार

कानपूर येथील आयआयटीमध्ये तृतीय वर्षांत शिकणारा अक्षय कांबळे हा विद्यार्थी बेपत्ता झाला असून तो बदलापूरचा आहे. गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अक्षयचा शोध घेण्यासाठी वडील कानपुरात असून तेथील पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कांबळे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बदलापूर पूर्वेतील अष्टविनायक सोसायटीत राहणाऱ्या आणि शिक्षक असलेल्या भीमराव कांबळे यांचा अक्षय कांबळे (२०) हा मोठा मुलगा कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश मिळाला होता. सध्या तो तृतीय वर्षांत शिकतो आहे. परीक्षेनंतर महिनाभराची सुट्टी असल्याने अक्षय २९ नोव्हेंबर रोजी बदलापूरला येण्यासाठी निघाला. मात्र तो महाराष्ट्रात दाखल झालाच नाही. मुलाच्या शोधासाठी वडिलांनी मित्रांसह कल्याण, मुंबई येथे तक्रारी देण्यास सुरुवात केली. मात्र त्यास काही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी कानपूरचे आयआयटी गाठले. संस्थेच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपास पुढे सरकला नव्हता.

वडिलांनी सतत पाठपुरवठा केल्यानंतर तपासात अक्षयच्या मोबाइलचे स्थान शोधण्यात आले. दोन सफाई कामगारांकडे अक्षयचे दोन सिम कार्ड सापडले, तर एक स्मार्टफोन एका मित्राकडून मिळवला गेला. मात्र यांच्याकडे अधिक चौकशी न करता, त्यांना तात्काळ सोडल्याचा आरोप भीमराव कांबळे यांनी केला आहे. सफाई कामगाराकडेच अक्षयचे एटीएम कार्ड आणि ओळखपत्र सापडते कसे, असा प्रश्न त्याच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. त्याचे सिम कार्डही दुसऱ्या हॉस्टेलच्या सफाई कामगारांकडे मिळाले आहेत. हॉस्टेलमधील काही सहकारी त्रास देत असल्याची तक्रार अक्षयने केली होती.

गेल्या पंधरा दिवसांपासून मी कानपूर येथे असून मला येथे कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. येथील पोलीस अधीक्षकांशी भेट घेतली मात्र तपासात प्रगती नाही. मात्र माझ्या मुलाबाबत चौकशी करण्याऐवजी अनेक संशयास्पद बाबी समोर आणत बदनामी केली जाते आहे. मला माझा मुलगा परत हवा आहे. यात दोनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी माझी विनंती आहे. –  भीमराव कांबळे, अक्षयचे वडील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:03 am

Web Title: badlapurs young man missing from kanpur
Next Stories
1 ‘फ्लाइंग किस’ महागात पडला, तरुणाला ५ हजार रुपयांचा दंड
2 पार्किंगच्या वादातून हुक्का पार्लर मालकाने केली रिक्षाचालकाची हत्या
3 एकनाथ शिंदे सेनेचे ‘ठाणेदार’ !
Just Now!
X