ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याने टीकेचे धनी ठरत असलेल्या महापालिका प्रशासनाने मंगळवार रात्रीपासून खड्डे भरण्याची कामे सुरू केली आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल हे दोघे स्वत: रस्त्यावर उतरले होते. शहराच्या विविध भागांत पहाटे तीन वाजेपर्यंत ही कामे सुरू होती आणि तोपर्यंत हे दोन्ही अधिकारी कामांची पाहणी करत होते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले असून या खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होत आहे. येत्या रविवारी महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे तर गणेशोत्सवही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या महिन्यात महापालिका प्रशासनाने खड्डे भरण्याची कामे केली होती. मात्र पावसामुळे हे खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता पुन्हा खड्डे भरण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून बुधवार रात्रीपासून या मोहिमेला सुरुवात झाली.

दिवसा खड्डे भरताना वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आयुक्त जयस्वाल यांनी रात्रीच्या वेळी खड्डे भरण्याचा निर्णय घेतला. वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून रात्रीच्या वेळी खड्डे भरण्याची कामे करण्यात आली.

आनंदनगर नाका, तीन हात नाका पूल, नितीन कंपनी पूल, कॅसल मिल, मानपाडा जंक्शन, दोस्ती इम्पिरिया, ब्रह्मांड, कोलशेत, ढोकाळी नाका, श्रीरंग सोसायटी, एसटी कार्यशाळा, खारटन रोड, मल्हार सिनेमा चौक या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. ही मोहीम तीन दिवस सुरू राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.