काळातलाव, कल्याण
टोलेजंग इमारतींच्या कोंदणामध्ये विस्तीर्ण तलाव, पाण्याची निरव शांतता आणि हिरवे गालिचे, चालण्यासाठी लांबलचक जॉगिंग ट्रॅक आणि सोबतीला व्यायामासाठी खुली व्यायामशाळा..कल्याणच्या काळातलाव परिसरातील हे वर्णन ऐकल्यानंतर या भागात मॉर्निग वॉकला जाण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. त्यामुळेच पावसाने उघडीक दिल्यानंतर वर्षांचे सगळे महिने या भागात येऊन मॉर्निग वॉक करत करत जीवनाचा आनंद घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच या परिसरामध्ये व्यायामाचा आणि चालण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा राबता सुरू होतो. त्यामुळे या भागातून पहाटेच्या सुमारास फेरफटका मारल्यानंतर या भागातील शरीरस्वास्थ्याच्या कल्पनेने झपाटून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी मंडळी दिसून येतात. तलावाच्या काठावरील जॉगिंग ट्रॅकवरून चालणाऱ्या आणि धावणाऱ्या मंडळींच्या चालण्याची लयसुद्धा त्यामुळे लक्ष वेधून घेते. तर कुणी खुल्या व्यायामशाळेतील साहित्यावर वर्क आउट करत घाम गाळण्याबरोबर शरीराची क्षमता वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. त्याच वेळी गवतावर बसून अनुलोम विलोम करणारी योगप्रिय मंडळीही एका बाजूला बसून आपल्या दिनचर्येची सुरुवात करतात. चालण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिक तलावची परिक्रमा संपून जागा मिळेल तेथे बसून जागतिक घडामोडींचा परामर्श घेतात. कल्याणच्या काळातलाव परिसरातील हे चित्र आता नेहमीचे झाले असले तरी नव्याने येणाऱ्याला हे नेहमीच वेगळे वाटते. त्यामुळे या भागात एकदा आल्यानंतर व्यायामासाठी सतत इथे पुन्हा पुन्हा येण्याची प्रेरणा मिळतच जाते. त्यामुळे काळातलाव परिसर म्हणजे व्यायामासाठी प्रोत्साहन देणारे ‘मॉर्निग स्पॉट’ आहे असे म्हणावे लागेल.

हरिओम मॉर्निग वॉक ग्रुप..
कल्याणच्या काळातलाव परिसरामध्ये येणाऱ्या मंडळींनी आता आपले ग्रुप स्थापन केले असून काळातलावाच्या सुशोभीकरणाच्या उद्घाटनानंतर लागलीच स्थापन झालेला हरिओम मॉर्निग वॉक ग्रुप गेली पाच वर्षांपासून इथे कार्यरत आहे. या गटात वयाच्या ३५ वर्षांपासून ७५ अशा सगळ्याच वयोगटांतील मंडळी आहेत. जैन सोसायटी परिसरात हा ग्रुप नेहमी एकत्र येतो. चालणे, व्यायाम, योग, टाळ्यांचे वेगवेगळे प्रकार आणि हास्याचा फुलोराही मंडळी इथे उधळतात. याशिवाय प्रत्येक सदस्याचे वाढदिवस साजरे केले जातात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन याशिवाय रंगपंचमीसारखे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. याशिवाय ज्येष्ठांसाठी सहलीचे आयोजन केले जाते. सुरेश नागरे, कृष्णा मोरे, पप्पू गुप्ता, लक्ष्मण गुंड अशी मंडळी या गटाचे संयोजन करतात.

छत्रपती राजे ग्रुप..
छत्रपती राजे हा ग्रुप गेल्या दोन वर्षांपासून इथे व्यायामासाठी एकत्र येत असून त्यामध्ये ४० जण सहभागी आहेत. डॉक्टर, वकील, व्यावसायिक, विकासक, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी या ग्रुपचे सदस्य असून कल्याण, मलंगगड आणि भिवंडी येथून ही मंडळी व्यायामासाठी दाखल होतात. सकाळी ६ ते ९ या वेळात इथे प्रथम स्वच्छता करणे, त्यानंतर व्यायाम आणि गप्पा असा त्यांचा दिनक्रम असतो. यानिमित्ताने विचारांची देवाणघेवण होते, शिवाय मैत्री वृध्दिंगत राहते, असे या गटातील सदस्यांचे म्हणणे आहे. मुकेश जाधव, निशांत म्हात्रे, समीर म्हात्रे, डॉ. वसंत साळुंखे, शरद पाटील, मदन साळुंखे, संतोष पाटील, गोरख पाटील, भावेश धोलकीया, राजू नलावडे आदी मंडळी या गटाचे नियोजन करतात.

स्थानिकांचे अतिक्रमण..
सुशोभीकरणामुळे काळातलाव अधिक देखणा झाला असला तरी त्याची वारंवार देखभाल दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. काळातलाव परिसराच्या बाजूला काही चाळींचे साम्राज्य असून ही मंडळी तलावाच्या कुंपणावर कपडे सुकत घालण्यासाठी वापर करतात. अनेक वेळा ही मंडळी तलावाच्या काठावरील गवतावर अतिक्रमण करून फिरणाऱ्यांना अडथळा निर्माण करत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा देखभाल दुरुस्ती करून आधुनिक ठेवण्याचा कोणताच प्रयत्न होत नसल्याने अवघ्या दोन महिन्यांमध्येच खेळण्याची साहित्ये तुटली आहेत. तर खुली व्यायामशाळेवर अयोग्य पद्धतीने व्यायाम केल्याने साहित्य तुटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. सध्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक असले तरी त्यांकडूनही परिसराची योग्य काळजी होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने अधिक कार्यक्षमतेने हा भाग सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. काळातलावचे सुशोभीकरण झाले असले तरी रात्रीच्या काळोखात या परिसराचा दुरुपयोग केला जातो. गर्दुल्ले आणि दारुडे या भागात येऊन दारू पिऊन बाटल्या तिथेच टाकून जातात. सकाळी दाखल झालेल्या व्यायामासाठी आलेल्या मंडळींना त्याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय या भागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व्यायाम झाल्यानंतर या भागात स्वच्छता करण्याची गरज आहे, असे मत येथे येणाऱ्या सुनील नागरे, सुनीता देशमुख, संगीता पाटील आदी मंडळींनी व्यक्त केला आहे.

काळातलावाची वैशिष्टय़े..
* ९६ हजार ७५७ चौ.मी. क्षेत्रफळाच्या काळातलावाला ऐतिहासिक महत्त्व असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने या भागाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
*  तलावाच्या सभोवताली जॉगिंग ट्रॅकची निर्मिती केली असून त्यावर दररोज सकाळी व संध्याकाळी हजारोच्या संख्येने नागरिक चालण्यासाठी आणि व्यायामासाठी दाखल होतात.
* परिसरामध्ये एका बाजूला लहान मुलांसाठी छोटेखाने गार्डन असून त्यावर लहान मुलांचे मनोरंजन होईल अशा खेळण्यांची रचना करण्यात आली आहे.
* चार महिन्यांपुर्वी या भागामध्ये खुली व्यायामशाळा उभारण्यात आली आहे.
* स्कॉय वॉकर, रोव्हर, पॉमेल हॉर्स, लेगप्रेस, चेस्टर प्रेसर, सुर्फ बोर्ड असे साहित्य या भागामध्ये उपलब्ध आहे.
* उपलब्ध व्यायाम साहित्यावर व्यायाम करण्याची इत्थंभूत माहिती दिली असल्याने नागरिकांना आवश्यकतेनुसार व्यायाम करता येतो.
* शिव आयुर्वेदिक हर्बल ज्यूस या स्टॉलवर वेगवेगळ्या फळांचे, भाज्यांचे ज्यूस इथे उपलब्ध होतात.
* दुर्गामाता मित्रमंडळच्या वतीने इथे वाचनालय चालवले जात असून व्यायाम संपल्यावर अनेकजण इथे वर्तमानपत्र वाचण्यासाठी एकत्र येतात.

अनुभवाचे बोल..
व्यायाम करताना आनंद वाटतो
इथे व्यायाम करत असल्यामुळे निसर्गाचा पुरेपूर आनंद घेता येतो. शिवाय इतरांचा व्यायाम पाहिल्यानंतर आपणही तसाच व्यायाम केला पाहिजे याचे प्रोत्साहन मिळते. शिवाय येथे संगीताचाही आस्वाद घेता येतो.
– मधुरा चौधरी, कल्याण

व्यायामाचे नैसर्गिक ठिकाण..

व्यायामशाळेत जाऊन व्यायामासाठी कोंडून घेण्यापेक्षा इथे निसर्गाच्या सान्निध्यात केलेला व्यायाम शरीरासाठी अधिक उपयुक्त होत असतो. व्यायामाचे नैसर्गिक ठिकाण, असे या परिसराला म्हटले पाहिजे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून इथे येत आहे. मात्र, या परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जाणवत असतो; त्यावर उपाय करायला हवा.
– दर्शन जैन, रामबाग

व्यायामशाळा कायमस्वरूपी व्हावी
खुल्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करण्याची संधी मिळत असल्याने सगळी मंडळी येथे येतात. मात्र ठरावीक वेळेनंतर ही व्यायामशाळा बंद केली जाते. त्यामुळे इथे येणाऱ्यांचा भ्रमनिरास होतो. कामावर जाणाऱ्या महिला रात्री उशिरा येऊन व्यायाम करण्याची शक्यता असून त्यांचा विचार केला पाहिजे. तसेच एकाच ठिकाणी महिला व पुरुषांची दाटी असते. त्यामुळे महिलांसाठी वेगळे साहित्य उपलब्ध करून द्यावे.
– कोकिळा पाटील, कल्याण

मनमोकळे वातावरण..
कल्याणच्या काळातलाव परिसरात गेल्या एक वर्षांपासून व्यायाम करण्यासाठी येत असले तरी इथे असलेल्या वातावरणामुळे मनमोकळा व्यायाम करण्यासारखे वातावरण मिळते. त्यामुळे इथे आल्यानंतर खुप वेळ इथेच थांबून व्यायाम करत राहावेसे वाटते. इथे नुसते बसून राहिलो तरी खुप सकारात्मक ऊर्जा मिळते.
– अमृता तेली, कल्याण