झटपट भूक भागवायची म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर इडलीपासून वडय़ापर्यंतचे अनेक पदार्थ येतात. याच पंक्तीत सर्वात भाव खातो तो समोसा. मध्य आशियामध्ये जन्मलेल्या समोशाला भारतात सुरुवातीपासूनच वडय़ाच्या जोडीला स्थान मिळाले. ठिकठिकाणच्या प्रदेशांतील चव, गरज यानुसार समोशाच्या आकारापासून त्यातील सारणापर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल होत गेला. आता तर चिकन समोसाही मिळू लागला आहे. पण मूळ स्वरूपातील समोशाची पसंती अजूनही कायम आहे.

कल्याणातील सदाशिव पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळक चौक परिसरातील ठक्कर फरसाण मार्ट येथील समोसाही आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहे. ठक्कर फरसाण मार्ट येथील समोसा आणि त्याबरोबर दिली जाणारी लाल चटणी खवय्यांच्या विशेष पसंतीची आहे. गरम मसाला, आले, मिरची, वाटाणा, बटाटे आदी जिन्नसांच्या मिश्रणातून समोशाचे सारण तयार केले जाते. मैदा, मीठ, तेल यांच्या मिश्रणातून समोशावरील मैद्याचे आवरण तयार होते. मिश्रण करताना सर्वप्रथम मैदा मळला जातो. मैद्यामध्ये तेल आणि तूप टाकण्यात येते. तेल आणि तुपामुळेच समोशाच्या खालच्या बाजूस कुरकुरीतपणा येतो, असे मितुल ठक्कर सांगतात. ठक्कर यांच्या दुकानातील समोशाचा हा कुरकुरीतपणाच समोशाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. त्याचप्रमाणे समोशामध्ये कांदा आणि लसणीचा वापर होत नसल्याने हा समोसा कोणत्याही खवय्यास खाताना अडचण येत नाही. समोशाबरोबर दिली जाणारी लाल चटणी बनविण्यासाठी ‘खमण ढोकळ्याचा चुरा’ मुख्यत्वे वापरला जातो. याशिवाय हळद, साखर, तिखट असे अन्य जिन्नसही चुऱ्याची चटणी बनण्यात मदत करतात. चटणी बनविताना प्रथम पाणी उकळले जाते. पाण्याला उकळी आल्यनंतर चटणीसाठी लागणारे हे सर्व जिन्नस विशिष्ट प्रमाणात पाण्यात टाकण्यात येतात. खमण ढोकळ्याच्या चुऱ्यामुळे या चटणीला घट्टपणा येतो. खमण ढोकळ्याची आंबट चव असलेली चटणी मस्तच आहे. गोड, तिखट आणि आंबट अशा तीन चवी चटणी खाताना अनुभवायला मिळतात. समोशाव्यतिरिक्त खमण ढोकळा, कचोरी, बाकरवडी आणि फरसाण या खाद्यपदार्थानाही खवय्यांची विशेष पसंती मिळते.
१९७६ मध्ये रमणिकलाल ठक्कर यांनी टिळक चौक येथे आपल्या फरसाणाच्या दुकानास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ठक्कर फक्त फरसाणाचा व्यवसाय करीत होते. मात्र अवघ्या दोन ते तीन महिन्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात समोसेही विकण्यास सुरुवात केली. १९८० पासून ठक्कर यांच्याकडील समोशांना नावलौकिक प्राप्त झाला आणि त्याची महती सर्वत्र पसरली. सुरुवातीच्या काळात ५० पैशांना मिळणारा हा समोसा आज १० रुपयांना मिळतो. १९९० पासून ठक्कर यांना त्यांच्या व्यवसायात मितुल ठक्कर या त्यांच्या मुलाने मदत
करण्यास सुरुवात केली. वडिलांचा हा व्यवसाय आज ते समर्थपणे सांभाळत आहेत.

ठक्कर फरसाण मार्ट
टिळक चौक, कल्याण (प.)
वेळ : स. ८.४५ ते ११.००