कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना नववर्ष स्वागत यात्रांचे निमीत्त साधून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच्या पाश्र्वभूमीवर डोंबिवली आणि कल्याणातील सिमेंट रस्त्यांची कामे रखडलेली कामी झटपट मार्गी लावण्यात यश आल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या मुद्दयावरुन शिवसेनेवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपुर्वी ही कामे मार्गी लागावीत यासाठी शिवसेना नेते या कामांचे वारंवार पहाणी दौरे आयोजित करत होते. तरीही कामाची गती काही वाढली नव्हती. असे असताना मुख्यमंत्री भेटीच्या तोंडावर बहुतांश रस्ते सुस्थितीत आल्याच्या मुद्यावरून याचे श्रेय स्वत:कडे घेण्यासाठी भाजपने  प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील दरी अधिकच रूंदावण्याची चिन्हे आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेत सेना-भाजप युतीची सत्ता असली तरी शिवसेना हा नेहमीच मोठय़ा भावाच्या तोऱ्यात वावरत राहिला आहे. त्यातच राज्यात भाजपचे वर्चस्व वाढल्यापासून शिवसेनेतील अस्वस्थता वाढत चालली आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची चाचपणी या दोन्ही पक्षांकडून आतापासूनच केली जात आहे. त्यासाठीच भाजपने कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा उचलायचे ठरवले आहे. शहरांतील रस्त्यावरून जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागण्याच्या भीतीने गेल्या काही महिन्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा येथे पाहणी करून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही शहरांतील रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही. त्यामुळे यंदा नववर्षांच्या स्वागतयात्रेचे मार्गही बदलले जाण्याची चिन्हे होती. यावरून चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची दवंडी पिटवून भाजपच्या नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेगात कामे करण्यास भाग पाडले. त्यामुळे स्वागतयात्रेतील मुख्य मार्ग असलेला फडके रस्ता चकाचक झाला आहे. एकीकडे भाजपचे बालेकिल्ले असलेल्या भागांत रस्त्यांच्या कामांनी वेग घेतला असताना शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागातील रस्ते मात्र खड्डय़ातच आहेत.  हाच मुद्दा हाताशी धरून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपकडून ‘करून दाखवले’चा गजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कामे होणे महत्वाचे
सिमेंट रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण आवश्यक होते. मुख्यमंत्री येणार आहेत. रस्त्यांचा पडलेला पसारा, ते विद्रुपीकरण त्यांच्या नजरेत भरणे कोणालाच आवडले नसते. आपण नेहमीच रखडलेली सिमेंट रस्ते कामे वेळेत पूर्ण करावी म्हणून अधिकाऱ्यांच्या मागे लागलो होतो. नववर्ष स्वागत यात्रा, त्यात मुख्यमंत्र्यांचे आगमन त्यामुळे ही कामे आपण स्वत: अधिकारी, ठेकेदारांना विश्वासात घेऊन पूर्ण करून घेतली आहेत. या कामांचा कोणताही आर्थिक बोजा पालिकेवर पडणार नाही. या कामांमध्ये कोणतेही राजकारण नाही.
– राहूल दामले, उपमहापौर, भाजप