बदलापूर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली असून यंदाच्या निवडणुकीला खुनशी राजकारणाचे गालबोट लागले आहे. पालिकेचे प्रभाग क्रमांक १ ते १० हे बदलापूर पश्चिम विभागात मोडत असून वडवली, बेलवली, मांजर्ली, मोहनानंद नगर, सवरेदय नगर, हेंद्रेपाडा आदी परिसरांचे मिळून हे प्रभाग तयार झाले आहेत. या प्रभागांमध्ये सरासरी मतदार संख्या ही तीन ते साडेतीन हजारांपर्यंत असून येथील प्रमुख लढती या शिवसेना-भाजप दरम्यानच आहेत.
यावेळी प्रभाग क्रमांक २ व ३ आरक्षित झाले असून शिवसेना व भाजपमध्येच येथे प्रमुख लढती आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक २ मध्ये मुक्ता पांडे व प्रभाग क्रमांक ३ मध्ये मिथुन कोशिंबे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आता शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर अनुक्रमे गौरी वाघ व हेमंत चतुरे या भाजपच्या उमेदवारांचे आव्हान आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये यंदा लक्षवेधी लढत होत आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या विरोधात शिवसेनेचे राजेश शर्मा उभे आहेत. या विभागातील चुरशीच्या लढतींपैकी ही एक आहे. प्रभाग क्रमांक ५ व ६ महिलांसाठी आरक्षित झाल्याने दिग्गजांना हे प्रभाग सोडावे लागले असून त्यांच्या पत्नी अथवा नातेवाईक निवडणुका लढवत आहेत. यंदा प्रभाग रचनेतून निर्माण झालेला प्रभाग क्रमांक ५ हा नवा प्रभाग असून येथे शिवसेनेच्या रिद्धीता घोरपडे, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या अश्विन पटेल या माजी नगरसेवकाची पत्नी दीपिका पटेल यंदा भाजपमधून नशीब आजमावत आहे. तर राष्ट्रवादीतून अनिता पाटील याही निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ६ हा अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव झाला असून यात शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांचे नवखे उमेदवार रिंगणात असून येथे कोणाच्या बाजूने निकाल लागेल यात संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रभाग क्रमांक ७ व ८ मध्ये प्रमुख लढत शिवसेना व भाजपमध्ये असून ७ मध्ये विद्यमान नगरसेवक व भाजप उमेदवार शरद तेली यांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवार व माजी नगरसेविका स्वप्ना पाटील उभ्या असून त्या श्रीधर पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे ही लढत श्रीधर पाटील विरूद्ध शरद तेली अशी रंगणार आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या विरोधात भाजपच्या प्रतिभा म्हात्रे या निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ९ हा सध्या चर्चेतील प्रभाग असून येथे प्रमुख लढत हा दोन माजी उपनगराध्यक्षांमध्ये आहे. उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे प्रभाकर पाटील हे सेनेचे उमेदवार अपक्ष झाले असून सध्या ते शिवसेना पुरस्कृत झाले आहेत. तर, राष्ट्रवादीतून तिकीट मिळविण्यात यशस्वी झालेल्या आशीष दामले निवडणूक रिंगणात आल्याने ही लढत लक्षवेधी ठरली असून या दोन मातब्बर प्रतिस्पध्र्यानी एकमेकांविरुद्ध आव्हान निर्माण केल्याने या प्रभागात तणाव निर्माण झाला आहे.
प्रभाग क्रमांक १० मध्ये आशीष दामले यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असून येथे शिवसेना व भाजपमध्ये तुल्यबळ उमेदवार दिल्याने येथे सुद्धा लढतीत चुरस असून सेनेच्या शोभा पाटील व भाजपच्या ममता पाटील निवडणूक लढवत आहेत.
संकेत सबनीस, बदलापूर