|| सागर नरेकर

अंबरनाथमध्ये विनियोग वेळेत नाही, बदलापुरात घरवाटपाची प्रतीक्षा

केंद्राच्या शहरातील गरिबांना प्राथमिक सुविधा पोहोचवण्याच्या हेतूने २००५ मध्ये बीएसयूपी योजना घोषित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठीही शहरी गरिबांना घरे देण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. मात्र बदलापूर शहरात आजही या योजनेतील घरे वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत तर अंबरनाथमध्ये या योजनेसाठी देण्यात आलेला निधी परत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांत बीएसयूपी योजना फसली आहे.

अंबरनाथमध्ये या योजनेसाठी पाच कोटींचा निधी देण्यात आला होता. त्याचा योग्य विनियोग वेळेत झाला नाही. त्यामुळे अनेक वर्षे हा निधी खात्यात पडून राहिला. त्यामुळे त्यावर तीन कोटींचे व्याजही मिळाले. मात्र या काळात पालिका या योजनेसाठी जागा संपादित करण्यात अपयशी ठरली. त्यासाठी चिखलोली भागात जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे पालिका या ठिकाणी काहीही काम करू शकली नाही. याचे सर्वेक्षणाचे कामही पूर्ण होऊ  शकले नाही. त्यामुळे पालिकेने इतर जागांचाही विचार केला. मात्र त्यातही यश आले नाही. त्या प्रकरणामुळे पालिका प्रशासन तोंडावर पडले होते. त्यामुळे पालिकेला अखेर या योजनेतून माघार घ्यावी लागली. मात्र यासाठीच्या कामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले. जागेअभावी कंत्राटदार काम करू शकला नाही. त्यात आता योजना गुंडाळावी लागत असल्याने कंत्राटदारानेही पालिकेवर दावा ठोकण्याची तयारी केली आहे. त्यासाठी लवाद स्थापन करण्याची मागणी त्याने केली आहे. तर पालिकेनेही हे पैसे परत देण्यासाठी अहवाल तयार केल्याची माहिती मिळत आहे.

२०१९ साल उजाडणार

कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत बीएसयूपी योजनेला २००६  मध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र २००९ पर्यंत या कामाचे साधे सर्वेक्षणही पूर्ण झाले नव्हते. प्रत्यक्ष कामाला २०१० मध्ये सुरुवात झाली होती. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधीच चार वर्षे लांबणीवर पडलेली ही योजना अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे. बदलापूर नगरपालिका क्षेत्रात १६३४ घरे मंजूर करण्यात आली होती. त्यातील म्हाडा वसाहत परिसरात उभारण्यात आलेल्या १६ इमारतींमध्ये ३२० घरकुले बांधून तयार आहेत तर सोनीवली येथे उभारण्यात आलेल्या २४ इमारतींत ४८० घरकुले तयार आहेत तर म्हाडा येथील एका इमारतीतील २० घरकुलांचे व सोनीवली येथील सात इमारतींतील १४० घरकुलांचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे.  याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांना विचारले असता, याची नव्याने यादी तयार करण्यात आली आहे. त्यात ४५० लाभार्थ्यांचा समावेश आहे. लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतही काहींचा समावेश यात करण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्ष जागेवर पाण्याची सुविधा नसल्याने यासाठी थोडा वेळ जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या घरांसाठी २०१९ साल उजाडणार हे मात्र निश्चित झाले आहे.