नायगाव पूर्वेहून महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडलेले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.

नायगाव ते बापाणे हा वसईसह महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. शाळकरी मुळे व येथील नागरिकांचा हा प्रमुख रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अडचणी निर्माण झाल्यामुळे ते काम पूर्ण होऊ  शकले नाही. त्याच रस्त्याची आता दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. याआधीच रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त असताना त्यात आता खड्डय़ांची भर पडलेली आहे. याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरिकांनीदेखील हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

या रस्त्याचे रुंदीकरण करावे तसेच रस्त्यावर गतिरोधक, सूचना फलक बसवून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नगरसेवक आणि प्रभाग समिती सभापती कन्हैया भोईर यांनी एमएमआरडीएकडे केली आहे.