‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप बंधनकारक केल्याने नागरिकांची नाराजी; वापर सक्तीमुळे सुरक्षा रक्षकांशी खटके

ठाणे : ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील अनेक मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे बंधन ग्राहकांवर टाकण्यात आल्याने ग्राहक आणि मॉल व्यवस्थापनामध्ये खटके उडत आहे. या अ‍ॅपच्या निर्मात्याविषयी मध्यंतरी केंद्र सरकारनेच अनभिज्ञता दाखविल्याने अनेकांनी ते मोबाइलमधून काढून टाकले आहे. याशिवाय बरेच ग्राहक हा अ‍ॅप नव्याने डाऊनलोड करण्यास असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे करोना काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करणाऱ्या मॉल व्यवस्थापनांपुढील अडचणी या ‘अ‍ॅप’ने वाढविल्या आहेत.

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरातील बाजारपेठांसह मॉल पुन्हा सुरू झाले आहेत. मॉल सुरू करताना महापालिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप मोबाइलमध्ये असणाऱ्या ग्राहकांनाच प्रवेश दिला जावा, अशी सक्ती मॉल व्यवस्थापनांना केली आहे. ही सक्ती योग्य नाही, असे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक मॉलच्या प्रवेशद्वारावर ग्राहक व सुरक्षारक्षकांमध्ये खटके उडत आहे. काही ठिकाणी ग्राहक रांगेतच अ‍ॅप डाऊनलोड करीत असल्याने प्रवेशद्वारांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे अंतरनियमांचा तर फज्जा उडत आहे, शिवाय गर्दी पाहून, कंटाळून काही ग्राहक माघारी फिरत आहे.

नियम कायम

ठाणे महापालिकेने सुरुवातीला मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ग्राहकांना शीघ्र प्रतिजन चाचणी करणे सक्तीचे केले होते. अशी चाचणी करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक प्रवेशद्वाराजवळ उभे असल्याचे पाहून अनेक ग्राहक माघारी फिरत असत. आधीच मंदीत सापडलेला व्यवसाय या चाचणी पथकामुळे गर्तेत जाईल, अशी भीती मॉल व्यवस्थापनांकडून सातत्याने व्यक्त केली गेली. त्यानंतर ठाणे महापालिकेने हा निर्णय बदलला. मात्र, आरोग्य सेतू अ‍ॅपची सक्ती अजूनही ठाणे, नवी मुंबईत आहे. ठाणे महापालिकेने निर्बंध शिथिल करताना आखलेल्या अनेक सूचनांची तशीच अंमलबजावणी जिल्ह्य़ातील इतर महापालिकांमार्फतही केली जाते. ठाणे महापालिकेने मॉल प्रवेशासाठी आरोग्य सेतू अ‍ॅपची सक्ती करताच हाच नियम नवी मुंबईसह जिल्ह्य़ातील इतर शहरांमध्येही कायम ठेवण्यात आला आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठीच बंधनकारक

मॉलमध्ये एखादा करोनाबाधित रुग्ण खरेदीसाठी आला तर त्याच्यामार्फत इतरांना करोनाची बाधा होऊ शकते. त्यातून शहरात करोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव आणि धोका रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने मॉलमध्ये प्रवेशासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक केले आहे, असा दावा ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे अ‍ॅप वापरण्यात येत असले तरी यामुळे आधीच मंदीत असलेल्या मॉलच्या व्यवसायावर ऐन दिवाळी सणाच्या काळात परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ग्राहक मॉलच्या प्रवेशद्वारावरच अ‍ॅप डाऊनलोड करीत असून यामुळे मॉलच्या प्रवेशद्वारांवर गर्दी होऊ लागली आहे. अनेक ग्राहक प्रवेशद्वारावरूनच माघारी परतत असून ते बाजारपेठा तसेच दुकानांमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅपची सक्ती नसल्याने तिथे खरेदीला पसंती देत आहेत.