News Flash

पावसाळ्यातील भाजीपाला

आपल्या सोसायटीत आपण अनेक प्रकारच्या वनस्पती लावून त्यापासून आनंद, सुगंध, आरोग्य, अन्न व उत्तम वातावरण मिळवू शकतो.

| August 20, 2015 03:39 am

शहर शेती
आपल्या सोसायटीत आपण अनेक प्रकारच्या वनस्पती लावून त्यापासून आनंद, सुगंध, आरोग्य, अन्न व उत्तम वातावरण मिळवू शकतो. त्यासाठी आवारात माती जमीन आवश्यक आहे. ती काँक्रीट किंवा पेवर ब्लॉकने बंदिस्त केलेली नसावी. या जमिनीत आपण वनस्पती लावून आपल्या तसेच भविष्यातील मुलाबाळांच्या गरजासुद्धा पूर्ण करू शकतो. आपण आपल्या पाण्याची गरज शासनाने पुरविलेल्या पाण्यावर भागविण्याचा प्रयत्न करीत असतोच, त्याचबरोबर आपल्याला कमी पडणाऱ्या पाण्यासाठी आवारात बोअरसुद्धा करतो व भूगर्भातील पाण्याचा उपसा करतो. हे पाणी खरे म्हणजे आपल्या मुलाबाळांचे ‘फिक्स्ड डिपॉझिट’ आहेत. तेसुद्धा आपण आत्ताच वापरतो आहोत. गरजेसाठी आपण जर ‘फिक्स्ड डिपॉझिट’ मोडले तर पुन्हा ते तयार करून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जेथे झाडे वाढतात तेथे जमिनीत सर्वात जास्त पाणी जिरते व मुरते. म्हणजेच आपल्या आवारात झाडे लावल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
आपण ही जी झाडे भाजी म्हणून लावणार आहोत त्याचे प्रकार माहिती करून घेऊ या. यात वृक्ष, मध्यम कालावधीचे छोटे वृक्ष, त्यावर वाढू शकणाऱ्या दीर्घायुषी वेली, त्याच्या आजूबाजूला पाणी शोषून घेणारी झाडे, मात्र पावसाळ्यात वाढणाऱ्या भाज्या, ज्यांना पाणी घालावे लागणार नाही व दुसरे अशा वनस्पती ज्यांना नंतर पाणी घातले नाही तरी चालू शकेल व ज्यांची निगादेखील कमीत कमी असेल.
अनेक वर्षे जगणारी, देखणी दिसणारी अशी दोन झाडे आपण आपल्या आवारात लावू शकतो. एक म्हणजे कोरल किंवा देव कांचन व बहावा. ही दोन्ही झाडे फुलतात तेव्हा खूप सुंदर दिसतात.
कोरल- देवकांचन, बहुनिया व्हेरीगेटा, कांचन म्हणजे सोने. दसऱ्याला जे सोने म्हणून आपण आपटय़ाची पाने देतो त्याच आकाराची पण तळहातांएवढी मोठी पाने या झाडाला असतात. तसेच आपटय़ाची पाने जशी जाड व खरखरीत असतात तशी ही नसतात, ती थोडी मुलायम असतात. म्हणून त्यांच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. शहरात आदिवासी महिला याचे वाटे विकायला बसलेल्या दिसतात. सध्याची सगळ्यात महाग भाजी कोरल समजली जाते. कोररला गुलाबी, फिक्कट गुलाबी रंगाची तळहाताएवढी फुले येतात. फांद्या व बियांपासून नवीन रोपे तयार करता येतात. हे झाड पंधरा ते वीस फूट उंच वाढू शकते. आकार छत्रीसारखा असतो. उन्हाळ्याच्या शेवटी छाटणी केल्यास पावसाळ्यात नवीन पालवी फुटते. या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्यास दूषित पाण्यामुळे होणारे विकार टाळले जातात.
बहावा, कॅशिया फिस्टुला, सुंदर फ्रेशलेमन यलो रंगाच्या फुलांचे घोस द्राक्षाच्या घडासारखे फांद्या फांद्यांवर लटकलेले भासतात. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर साधारण दीड महिना आधी (४५ दिवस) हे झाड फुलते. या झाडाची पूर्ण पाने गळून जातात आणि कोवळी पालवी व कळ्या येऊन झाड फुलू लागते. अतिशय देखणा असा पुष्प उत्सव सुरू होतो. फुले देठाकडून फुलत फुलत टोकापर्यंत फुलतात. फुले जून झाल्यावर पाकळ्या पांढरट पिवळी होऊन गळून जातात. यानंतर झाडाला लांब गोल माकडाच्या शेपटीसारख्या शेंगा लागतात. या जून झाल्यावर काळपट तपकिरी होतात. नळीसारख्या शेंगामध्ये आडवे असंख्य कप्पे असतात व बारीक वालाएवढय़ा चपटय़ा बिया असतात. दोन बियांच्या मधल्या पापुद्रय़ाला मगज असतो. तो गोड लागतो व पोटाच्या विकारात औषध म्हणून वापरतात. बहाव्याच्या फुलांच्या घोसाची भाजी करतात.
सुंदर न दिसणारे पण अनेक भाग उपयुक्त असलेले शेवग्याचे झाड आपण आपल्या आवारात लावू शकतो. शेवग्याची फाटे कलमापासून किंवा बियांपासून अभिवृद्धी करता येते. झाडाचे लाकूड, कुजके असते, फांद्या वाऱ्या वादळात मोडतात, शेंगा व पाने खुडण्याच्या दृष्टीने शेंगा येऊन गेल्यावर छाटणी करावी. दर तीन वर्षांनी तीन ते चार फूट किंवा कमरेएवढा बुंधा ठेवून झाड तोडावे. या झाडाचे सर्व भाग उपयोगी आहेत, मूळ, साल, पाने, फुले, शेंगा व बिया. आपण प्रामुख्याने कोवळ्या पानांची व फुलांची भाजी करतो. शेंगा सांबार, पिठल्यात वापरतो. पानांची भाजी अनेक शारीरिक व्याधी दूर करते. लहान मुलांच्या चेहऱ्यावरती पांढरे डाग पडतात. ही भाजी खाल्ल्यावर पोटातील जंत मरतात तेव्हा चेहऱ्यावरचे हे पांढरे डाग जातात. याचबरोबर लोह व कॅल्शियमची कमतरता ही भाजी खाल्ल्यामुळे कमी होते. फुलांची भाजी पण करतात किंवा आमटीत पण वापरतात.
झाडावर शेंगा जून होऊन पूर्ण सुकल्यानंतर शेंगा काढून त्यामधील बी काढून घ्यावी. या बियांपासून तेल काढतात. हे तेल घडय़ाळात वंगण म्हणून वापरतात. या बियांच्या आत परत वाटाण्या एवढे बी असते. या बियांचे चूर्ण चिमूटभर घातले तरी हंडाभर पाणी शुद्ध व र्निजतुक होते.
जिथे टाकीचे ओव्हरफ्लोचे पाणी वाहते तिथे अळूची लागवड करता येते. मातीचा उलटा आकार करून (वरंबा) पावसाळ्यात त्यावर अरवी किंवा आळकुडीची लागवड करून त्यापासून पाने व पावसाळ्यानंतर आळकुडय़ा मिळवू शकतो.
खास पावसाळ्यात होणाऱ्या काही पालेभाज्या आपल्या आवारात अतिशय कमी मेहनतीमधून मिळवू शकू. लाल देठाची अंबाडी, हिरवा माठ, लाल माठ, कुर्डू या भाज्यांच्या बिया पेरून दिल्यावर कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही. कुर्डूचेही दसऱ्याला जे तोरण बांधतो त्यात शंकूच्या आकाराची बोटभर लांबीची जांभळी, पांढरी फुले असतात. त्यामध्ये बारीक बी असते. फुले गोळा करून ताटलीत ठेवून कडकडीत उन्हात वाळवून त्यातून बी काढून ठेवावे. कुर्डूच्या भाजीने किडनी स्टोन विरघळतो. तांबडी अंबाडी कंबरेएवढी उंच वाढते. याची रोपे करून योग्य अंतरावर याची लागवड करतात किंवा बी पेरून करतात. याला अनेक फांद्या येतात. त्यांची छाटणी करून त्यांच्या पानांची भाजी करू शकतो. पाने खूप आंबट असतात. दक्षिण भारतात पानांचे लोणचे करतात. अंबाडीच्या झाडाला साधारण दोन-तीन महिन्यांनी फुले येतात. मोठी पिवळी फुले देखणी दिसतात. फूल गळून गेल्यावर सुपारीएवढी फळे, बोंडे येतात. त्याच्या बाहेर लाल रंगाचे फुलासारखे आवरण असते. ते पण खूप छान दिसते. ती सहजपणे वेगळी करता येते. त्याची पण छान चटणी करता येते. जाम व सरबतसुद्धा बनते. आत जे बोंड असते त्यात असलेल्या बियांपासून परत रोपे करता येतात.
हिरवा व लाल माठाचे बी कृषी केंद्रातून आणावे लागते. बी हलके व बारीक असल्यामुळे यात वाळू मिसळून लावावे म्हणजे एकाच जागी जास्त बिया पडणार नाहीत. भाज्या मुळासकट उपटू नयेत, त्यांची कापणी करावी, दोन-तीन कापण्या करता येतात. नंतर त्याला फुले येतात, त्यातील बी काढून ठेवावे. त्यांच्या जाड देठाची भाजीसुद्धा खूप छान लागते. या देठाच्या भाजीत सुकी मच्छी मिसळून केलेला पदार्थ मांसाहारींना भावतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:39 am

Web Title: city agriculture
Next Stories
1 समूहचित्राकडून सेल्फीकडे..!
2 बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
3 परिश्रम करून यश मिळवा!
Just Now!
X