मराठी भाषेला केवळ अस्मितेशी नव्हे तर अस्तित्वाशी जोडा तरच मराठी भाषा जगेल. मराठी समृद्ध करण्यासाठी श्याम जोशी यांनी बदलापुरात उभे केलेले हे मराठी भाषेचे विद्यापीठ अद्भुत असून त्यांनी पुढच्या पिढय़ांसाठी मोलाचे कार्य करून ठेवले आहे, असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
स्वायत्त मराठी विद्यापीठाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने झालेल्या संकल्पपूर्ती संमेलनात ते येथे बोलत होते.
या वेळी या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द. भि. कुलकर्णी, ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीधर पाटील, विद्यापीठाचे विश्वस्त प्रल्हाद मुंढे, दिलीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी डॉ. मोरे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत मराठी भाषा मरणोन्मुख आहे असे आपल्याला वाटते का, या प्रश्नावर ते म्हणाले की, इंग्रजांच्या काळातही मराठी भाषा तग धरून राहिली.
भाषेला जीवनानुभवाशी जोडले तरच ती टिकून राहील. त्यामुळे मराठी ही जिवंत भाषा आहे. यावेळी त्यांनी साहित्यिक वि. का. राजवाडे यांनी मांडलेल्या इतिहासाबाबत परखड मते व्यक्त केली.
राजवाडे यांनी इतिहास लिहिताना ठरावीक जातीच्या लोकांना समोर ठेवून इतिहास मांडला आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. प्रसिद्ध अनुवादक विरूपाक्ष कुलकर्णी आणि उमा कुलकर्णी यांना गौरववृत्ती पुरस्कार यावेळी डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर यांनी केले. संमेलनाला आलेल्या रसिकांनी साहित्यप्रेमींनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

नेमाडे जास्त रिकामटेकडे
या वेळी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नेमाडे यांच्यावरच टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लेखन, संमेलने, उत्सव करण्यास थोडा रिकामा वेळ हा लागतोच. नोकरी करणारा माणूस ही कामे करू शकत नाही. त्यामुळे एका अर्थाने हा रिकामटेकडय़ांचा उत्सव आहे. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची साहित्यसंपदा माझ्यापेक्षा जास्त असल्याने ते जास्त रिकामटेकडे आहेत. संमेलने ही रिकामटेकडय़ा लेखकांची कामे असल्याची टीका नेमाडे यांनी केली होती.