‘एमएमआरडीए’च्या पत्राकडे पालिकेचे दुर्लक्ष; जाणीवपूर्वक पत्र दडपल्याचा आरोप

भगवान मंडलिक

कल्याण : भिवंडी दिशेने कल्याण शहरात येणाऱ्या प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या सीमारेषेत विकासकांना बांधकाम परवानग्या देण्यास मज्जाव करणारे पत्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाठवले होते. मात्र, त्यानंतरही गेल्या तीन वर्षांत पालिकेने या प्रस्तावित मेट्रो मार्गावर १० ते १२ विकासकांना बांधकाम परवानगी दिल्याचे उघड झाले आहे.

ठाणे ते कल्याण (बाजार समिती) २४ किमीचा मेट्रो मार्ग प्राधिकरणाकडून बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी या प्रकल्पाचे भूमिपूजन कल्याणमध्ये झाले होते. ठाणे, भिवंडी, कल्याण शहरांत मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यानंतर प्राधिकरणाचे तत्कालीन आयुक्त मदान यांनी सर्व पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मेट्रो मार्ग प्रस्तावित असलेल्या सीमारेषेच्या भागात एकाही इमारत बांधकाम किंवा व्यापारी बांधकामाला परवानगी देऊ नये, अशी सूचना केली होती.  तसेच अशा बांधकामांना परवानगी द्यायची असेल, बांधकामावर ‘विकास हक्क हस्तांतरण’ (टीडीआर) चढवायचा असेल, तर अशा प्रकरणांसाठी प्राधिकरणाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक करण्यात आले होते.  मेट्रो मार्ग गूगल इमेजवरून प्रस्तावित केला आहे. या मार्गिकेचे आराखडे प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर पालिकांना उपलब्ध असल्याचे कळविले होते. कल्याण डोंबिवली पालिकेत २४ डिसेंबर २०१६ रोजी रवींद्रन यांनी हे पत्र स्वीकारले. हे पत्र तत्कालीन शहर अभियंता, नगररचना विभाग प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण विभाग प्रमुख यांच्याकडे आयुक्तांनी कार्यवाहीसाठी पाठवून दिले. मात्र या प्रमुखांनी या पत्राची दखल घेण्याऐवजी मेट्रो मार्गात १० ते १२ बांधकाम परवानग्या दिल्या, अशी माहिती पुढे येत आहे. दोन विकासकांना ‘टीडीआर’ चढविण्यासाठी मंजुरीही देण्यात आली. पालिका अधिकाऱ्यांनी संगनमताने प्राधिकरणाला अंधारात ठेवून या परवानग्या दिल्या आहेत, अशा तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. हे महत्त्वाचे पत्र दडपून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा तत्कालीन निवृत्त शहर अभियंता जबाबदार आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी ‘एमएमआरडीए’चे विद्यमान आयुक्त आर. ए. राजीवयांच्या निदर्शनास आणले आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना, सात विकासकांना पालिकेने नोटिसा बजावल्याचे समजते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

‘राजपत्रानुसार कार्यवाही करणार’

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे विद्यमान आयुक्त गोविंद बोडके यांनी याप्रकरणी राज्य शासनाच्या राजपत्रानुसार (गॅझेट) कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ‘गेल्या जूनमध्ये प्राधिकरणाचे मेट्रो मार्गात बांधकाम परवानग्या देताना ‘एनओसी’ घेण्यासंदर्भातचे राजपत्र (गॅझेट) आले. त्यामुळे जून २०१९ पासून मेट्रो मार्गिकेत एकही बांधकाम परवानगी दिली नाही. यापूर्वी अशा प्रकारच्या परवानग्या देण्यात आल्या नाहीत. तरीही नजरचुकीने परवानगी दिली आहे का याची तपासणी केली जात आहे, ’ असे ते म्हणाले.

या ठिकाणी बांधकाम परवानग्या

दुर्गाडी किल्ला, लाल चौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौक, कल्याण रेल्वे स्थानक ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (पत्रीपूल) या मेट्रो मार्गावर या बांधकाम परवानग्या नगररचना विभागाने दिल्या आहेत.