अधिनियमातील कलमाचा गैरवापर होत असल्याचा पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकाचा आरोप

ठाणे महापालिकेत कोटय़वधी रुपयांच्या वादग्रस्त कंत्राटांचे प्रस्ताव ऐनवेळी सर्वसाधारण सभेपुढे मांडून त्यांना मंजुरी दिली जात असल्याचा विरोधकांचा आरोप ताजा असतानाच सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर अशोक वैती यांनीदेखील हाच मुद्दा अधोरेखित करत पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ‘आपात्कालीन परिस्थितीतील कामे करण्यासाठी अधिनियमांत तरतूद असलेल्या कलमांचा आधार घेऊन कोणतीही कामे नगरसेवकांकडून मंजूर करवून घेतली आहेत,’ असा घणाघाती आरोप वैती यांनी सर्वसाधारण सभेत केला. एवढेच नव्हे तर, ‘ज्या दिवशी आनंद दिघेसाहेब माझ्या स्वप्नात येतील, तेव्हा मी याविरोधात थेट न्यायालयात जाईन आणि प्रशासनासह तुम्हालाही न्यायालयाची पायरी चढायला लावेन,’ अशी तंबीही वैती यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना दिली.

ठाणे महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून कोटय़वधी रुपयांची कामांना मंजुरी दिली जात असून यापैकी काही निविदा वादग्रस्त ठरू लागल्या आहेत. प्रशासन आणि सत्ताधारी पक्षातील अभद्र युतीमुळे महापालिकेत कोटय़वधी रुपयांच्या ठेक्यांची मनमानी मंजुरी कारभार सुरू असल्याचा आरोपही विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. हा आरोप ताजा असताना सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी थेट आनंद दिघे यांचे स्मरण करत स्वपक्षीय नगरसेवकांना ‘सावध’ केल्यामुळे  शिवसेनेच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. ‘महापालिकेत सध्या तातडीच्या कामाच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांची कामे केली जात आहेत. या कामांविषयी सखोल चर्चा करणे अपेक्षित असताना तसे होत नाही. या अशा कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून भविष्यात नगरसेवक म्हणून आपण अडचणीत येऊ,’ असे वैती यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले. ‘ठाणे महापालिकेत २५ वर्षांपूर्वी पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या तक्रारीमुळे नेमण्यात आलेल्या नंदलाल आयोगाचे भूत अजूनही आपल्यापैकी अनेकांची पाठ सोडायला तयार नाही. दिघे यांनी महापालिकेतील टक्केवारीचा भ्रष्टाचार जसा बाहेर काढला होता तशी वेळ माझ्यावर आणू नका.  साहेब ज्या दिवशी स्वप्नात येतील त्या दिवशी मी न्यायालयात जाण्यासही मागेपुढे पाहणार नाही,’ असे ते म्हणाले. मागील महिन्यात तातडीच्या कामांच्या नावाखाली वृक्ष प्राधिकरणाशी संबंधिंत असलेला २५ कोटी रुपयांचा वादग्रस्त प्रस्ताव ५ (२) (२) कलमान्वये मंजूर करून घेतला. ही प्रक्रिया नियमाला धरून नाही. या मुद्दय़ांवर एखादा न्यायालयात गेला तर सगळी उत्तरे नगरसेवकांना द्यावी लागणार आहेत हे लक्षात ठेवा, असे वैती या वेळी म्हणाले. या वेळी उपस्थित असलेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकरणांचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला मात्र वैती यांचा विरोध कायम होता.

तातडीचे विषय असे..

तुळशीधाम येथील बीएसयूपी प्रकल्प बांधकामात ठेकेदाराला ११ कोटी रुपये वाढवून देणे तसेच शासन योगा शिकविण्यासाठी एका शिक्षिकेला महिना ६० हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचा विषय आपत्कालीन सदरात मंजूर झाला आहे. दैनंदिन सफाईच्या ठेकेदारालाही या सभेत तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाचाही यामध्ये समावेश आहे. महापालिकेची स्थायी समिती सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे ही प्रकरणे सर्वसाधारण सभेपुढे येत आहेत.