३० ते ४४ वयोगटातील नागरिकांची केंद्रांवर गर्दी

ठाणे : करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सोमवारपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्याने या मोहिमेत नवा उत्साह निर्माण झाला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांसह जिल्ह्यात विविध ठिकाणच्या केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाइन पद्धतीने पूर्व नोंदणी करण्यासोबतच प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन लस घेण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, लसीकरण केंद्रांवर याबाबतची वर्गवारी नसल्यामुळे तसेच योग्य नियोजन न केल्याने अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचेही दिसून आले.

केंद्र सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मुभा राज्यांना दिल्यानंतर राज्य शासनाने शनिवारपासून या वयोगटासाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले. ठाणे जिल्ह्यात शनिवारी काही मोजक्या केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे ३० ते ४४ वयोगटातील  नागरिकांनी पहिल्याच दिवशी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे या केंद्रावरील लसीकरण केंद्र सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. तर, ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी ४९ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. त्यापैकी ४६ केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात आली. कल्याण – डोंबिवली शहरात २१ लसीकरण केंद्रांवर ३० वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी लाभार्थी नागरिकांनी या केंद्रांवर मोठ्या संख्येने गर्दी केली. केंद्र चालकांनी योग्यरीत्या नियोजन केल्याने केंद्रांवर गोंधळ झाला नाही, असे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

उल्हासनगर शहरात पाच लसीकरण केंद्रे असून सोमवारी या सर्व केंद्रांवर ३० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होते. अंबरनाथमधील दोन आणि बदलापूरमधील तीन केंद्रांवर ३० वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ठाणे ग्रामीण क्षेत्रात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे एकूण १४७ लसीकरण केंद्रे आहेत. या क्षेत्रात शनिवारी आठ केंद्रांवर ३० ते ४४ वयोगातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तर, या वयोगटातील नागरिकांची संख्या लक्षात घेऊन सोमवारी या क्षेत्रात ५० लसीकरण केंद्रांवर ३० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.