पोलिसांचे शांततेचे आवाहन

बकरी ईदच्या वेळी चिंचणी भागात झालेल्या गाईंच्या कत्तली मुळे तारापूर चिंचणी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली होती. यानुसार पोलिसांनी दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांची सभा घेऊन शांततेत राहण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.

चिंचणी खाडी नाका टेलिफोन एक्सचेंजच्या भागात रिफाई मोहल्ला येथे बकरी ईदच्या दिवशी सायंकाळी मोठय़ा प्रमाणात गाईंची कत्तल होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. यानुसार दोन चार हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सायंकाळच्या सुमारास गाईंची कत्तल होत असलेल्या भागात जाऊन सदर प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर संपूर्ण तारापूर चिंचणी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सोमवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपींची नावे माहिती नसल्याने रात्रीच्या वेळी पोलिसांना आरोपींना ताब्यात घेता आले नाही.चिंचणी व तारापूर भागात नेहमीच गाईंची कत्तल होत असल्याचे या अगोदरदेखील उघड झाले होते. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेवून शेतकऱ्यांची मोकळी जनावरे चोरी करून त्यांची तारापूर चिंचणी भागात कत्तल केली जाते. एका वाहनातून जनावरांची तस्करी केल्या प्रकरणी आठ दिवसांपूर्वी वाणगाव पोलिसांनी कारवाई केली होती.

पोलिसांनी तपास करून तीन संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. गुन्हा केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.    – राहुलकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाणगाव.