काळजी संच, प्रचारसाहित्य, इंजेक्शनचा साठा धूळखात; अंबरनाथ तहसील कार्यालयातील प्रकार

अंबरनाथ: शासनाच्या योजना तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नसल्याची सातत्याने ओरड होत असते. असाच काहीसा प्रकार अंबरनाथ तहसील कार्यालयात असलेल्या गोदामात समोर आला आहे. कुपोषित बालकांसाठी वाटायचे असलेले खजूर, काळजी वस्तूंचा संच, आशा सेविकांना आरोग्यांच्या प्रबोधनासाठी असलेले प्रचार साहित्य, मार्गदर्शन पुस्तिका, इंजेक्शन, माहिती पुस्तिका असे साहित्य आरोग्य विभागाच्या गोदामात धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. काही पुस्तिका तर अक्षरश: सडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.

अंबरनाथच्या तहसील कार्यालयात जिल्हा आणि तालुकास्तरावरची विविध कार्यालये आहेत. याच इमारतीत गटविकास अधिकारी, जिल्ह्य़ाच्या आरोग्य विभागाचे कार्यालय, पंचायत समिती अशी कार्यालये आहेत. इमारतीच्या उजव्या बाजूला असलेली खोली वजा कार्यालये शासकीय योजनांचे साहित्य ठेवण्यासाठी गोदामाच्या स्वरूपात वापरल्या जातात. या गोदामांचा ताबा चहा विक्रेत्यांकडे असतो. गेल्या काही दिवसांपासून या गोदामामध्ये विविध प्रकारचे साहित्य धूळखात पडून असल्याची माहिती एका स्वयंसेवकाकडे होती. त्यानुसार या गोदामाची पाहणी केली असता यात विविध प्रकारचे आरोग्य प्रचार, प्रबोधन आणि माहिती साहित्य आणि वस्तू धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाच्या वतीने पंचायत समितीला देण्यात येणारे लहान मुलांचे शेकडो संगोपन संच धूळखात पडून आहेत. यात नवजात मुलांचे कपडे, तेल, साबण आणि काळजी घेण्याचे जवळपास २२ वस्तूंचा समावेश असलेले संच अनेक महिन्यांपासून धूळखात पडून असल्याने ते खराब होण्याची भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे हे संच अद्याप का वाटप करण्यात आलेले नाही, असा सवाल उपस्थित होतो आहे.

कुपोषित मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले खजूर राहटोली येथील कार्यालयात पडून आहेत. त्याचे वेळीच वाटप न झाल्यास हे खजूर सडून खराब होण्याची भीती व्यक्त होते आहे.

अंगणवाडय़ा प्रतीक्षेत

अंबरनाथ तालुक्यात सुमारे १२४ अंगणवाडय़ा अस्तित्वात असून त्या माध्यमातून शेकडो माता, लहान मुलांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यात कुपोषित मुलांसाठी डिसेंबर महिन्यात १३६९ तर जानेवारी महिन्यात तितकीच खजुराची पाकिटे अंबरनाथ तालुक्यात आली. स्तनदा मातांसाठी असलेले लहान मुलांचे काळजी संच चक्क ऑगस्ट महिन्यात पाठवण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हे संच अंबरनाथ तालुक्यात वाटपासाठी आले. कुपोषित मुलांसाठी ग्लुकोजची भुकटीची ६०० पाकिटे जुलै महिन्यात आली होती. तर जानेवारी महिन्यात तितकीच पाकिटे अंबरनाथ कार्यालयात आली. मात्र आजतागायत त्याचे वाटप करण्यात आलेले नाही.