लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंबई आणि नवी मुंबई शहरातून ठाणे शहरात प्रवेश करताना लागणाऱ्या भव्य कमानी ठाणे महापालिकेकडून पाडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २५ वर्षांपासून या कमानी ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर उभ्या होत्या. या कमानी धोकादायक झाल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या पाडण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या स्थापनेनंतर ठाणे-मुंबई, नवी मुंबईच्या वेशीवरील कोपरी-आनंदनगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विटावा येथे भव्य कमानी बांधण्यात आल्या होत्या. या भव्य कमानी ठाणे शहराची ओळख ठरत होत्या. मात्र, २५ वर्षांंपूर्वी बांधण्यात आलेल्या या कमानी आता धोकादायक ठरू लागल्या आहेत. या कमानीचे सिमेंटचे आवरण वारंवार निघून ते रस्त्यावर पडत आहे. यातून एखादी मोठी दुर्घटना घडण्याचा धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने या तिन्ही कमानी पाडण्याचा निर्णय घेतला.