News Flash

डासांच्या अळ्या सापडल्यास गुन्हा

ऑगस्ट महिन्यात साठलेल्या पाण्यात डास मोठय़ा प्रमाणात अळ्या घालत असतात.

मिरा-भाईंदर महापालिकेचा विकासकांना इशारा; ७० जणांना नोटिसा.

पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांसाठी कारणीभूत असणारे डास स्वच्छ पाण्यात वाढत असतात. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या आवारात पाणी साठून त्यात डासांची पैदास मोठय़ा प्रमाणावर होत असते. त्यामुळेच इमारतीच्या आवारात साठलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मिरा-भाईंदर महापालिकेने विकसकांना दिला आहे. आतापर्यंत बांधकाम सुरू असलेल्या ७० विकासकांना अशा प्रकारच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात साठलेल्या पाण्यात डास मोठय़ा प्रमाणात अळ्या घालत असतात. या महिन्यात पावसाचा जोर कमी असतो, पाणी संथ असते, त्यामुळे हा काळ डासांना अंडी घालण्यासाठी उत्तम असतो. त्यामुळेच १५ ऑगस्टनंतर डेंग्यू, मलेरियासारखे आजार डोके वर काढू लागतात. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमधील पाण्याच्या टाक्या, खणलेले खड्डे, इमारतीची गच्ची अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साठून राहते. या पाण्यात डास अंडी घालत असतात. त्यामुळे आजारांचे रुग्ण सापडलेल्या परिसरात हमखासपणे इमारतींचे बांधकाम सुरू असल्याचे आढळून येते. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विकासकांना नोटिसा जारी करून या काळात घ्यायच्या खबरदारीबाबत सूचना दिल्या आहेत. यात प्रामुख्याने इमारतीच्या आवारात पाणी साठून न देणे. तसेच बांधकाम मजुरांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे आदी सूचनांचा समावेश आहे. या सूचनांचे पालन झाले नाही व इमारतीमधील पाण्यात डासांच्या अळ्या सापडल्यास विकासकांवर सार्वजनिक ठिकाणी आरोग्याला धोका निर्माण केल्याच्या कारणास्तव गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

रहिवासी सोसायटय़ांकडेही लक्ष

बांधकाम सुरू असलेल्या इमारतींव्यतिरिक्त रहिवासी सोसायटय़ांच्या आवारतही जमवून ठेवलेले भंगार सामान, नारळाच्या करवंटय़ा, टायर आदीमध्ये पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती होत असते. शिवाय घरांमधूनदेखील लावण्यात आलेल्या झाडांच्या कुडय़ांखाली ठेवण्यात आलेल्या भांडय़ामधील पाण्यात, फ्रिजच्या मागील बाजूला जमा होणाऱ्या पाण्यात, न्हाणीघरातील पिंपामधून डास अळ्या घालत असतात. महापालिकेने सध्या हाती घेतलेल्या सर्वेक्षणात शंभर घरांपैकी पंधरा ते वीस घरांमधील पाण्यात डासांच्या अळ्या आढळून येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यासाठी घरातही पाणी साठवून न ठेवता आठवडय़ातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. पालिकेच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समवेत फवारणी करणारे कर्मचारी देण्यात आले आहेत. हे पथक  मलेरिया अथवा डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या परिसरात भेट देतात, त्या ठिकाणी औषध फवारणी करतात तसेच जनजागृती करण्याचे काम करत आहेत. डासांची पैदास रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:55 am

Web Title: dengue issue in mira bhayandar
Next Stories
1 बसच्या धडकेने जलवाहिनी फुटली
2 माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांना अटक
3 बदलापुरात उघडय़ावर खाद्यविक्री
Just Now!
X