18 February 2019

News Flash

मीरा-भाईंदरचा विकास आराखडा फुटला?

मीरा-भाईंदर शहराचा विकास आराखडा १९९७ मध्ये तयार करण्यात आला होता.

प्रस्तावित आराखडा रद्द करण्यासाठी पडद्यामागून हालचाली; बडय़ा विकासकांचा हात असल्याचा संशय

मीरा-भाईंदर शहरासाठी तयार करण्यात येत असलेला नवा विकास आराखडा प्रसिद्ध होण्याआधीच फुटला असल्याची जोरदार चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरू आहे, परंतु नव्या विकास आराखडय़ामुळे शहरातील काही नामांकित विकासक अडचणीत येत असल्याने आराखडा फुटीमागे हा आराखडाच रद्द व्हावा, असे षड्यंत्र विकासकांकडून रचण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मीरा-भाईंदर शहराचा विकास आराखडा १९९७ मध्ये तयार करण्यात आला होता. दर वीस वर्षांनी आराखडा नव्याने तयार केला जात असल्याने शहराचा नवा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा महासभेपुढे येऊन त्याला मान्यता मिळाली की त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून नंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाते. तोपर्यंत आराखडय़ाच्या बाबतीत गोपनीयता पाळण्यात येत असते, परंतु मीरा-भाईंदरचा विकास आराखडा अद्याप महासभेपुढे आलेला नसतानाच आराखडय़ातील काही पाने नुकतीच समाजमाध्यमांवर फिरू लागली आहेत, परंतु ही पाने मीरा-भाईंदरच्या विकास आराखडय़ामधलीच आहेत का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पानांवर कोणा अधिकाऱ्याची सहीदेखील नाही, परंतु ही पाने मीरा-भाईंदरच्या विकास आराखडय़ातीलच असल्याचा दावा केला जात असून त्याची चर्चा समाजमाध्यमांवर जोरदार रंगली आहे.

यामागे बडय़ा विकासकांची एक मोठी लॉबी कार्यरत झाली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. शासनाकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत आणि या योजनांचा समावेश विकास आराखडय़ामध्ये करण्यात आला आहे. याचा थेट फटका शहरातील काही मातब्बर विकासकांना बसला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या विकासकांच्या जागा शहरातील मोक्याच्या जागी असून त्यावर आरक्षणे आल्याने या जागांवर पाणी सोडण्याची वेळ या विकासकांवर ओढवणार आहे. विकासकांनी या जागा विकत घेताना त्या अगदी मातीमोल भावाने विकत घेतल्या आहेत. सध्या या जागांची किंमत कोटय़वधी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

अशा जागांवर आरक्षण आले तर या जागा विकसित करता येणार नाहीत अशी भीती या विकासकांना वाटत असल्याने या विकासकांच्या लॉबीनेच हा आराखडा फोडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आराखडा फुटला, अशी जोरदार चर्चा होऊन त्याची चौकशी होईल आणि आराखडा आपोआपच रद्द होईल आणि तो नव्याने तयार केला जाईल, असे आराखडे बांधण्यात येत असून यामागे एक नियोजित असा डाव रचण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

चौकशीची मागणी

याआधी बेकायदा कामे करणाऱ्या विकासकांनी आरक्षणाच्या अनेक जागा गिळंकृत करून त्यावर अनधिकृत इमारती उभ्या केल्या आहेत. आता हेच विकासक आराखडा रद्द करण्यासाठी प्रयत्नशील झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. फुटलेल्या आराखडय़ाची चौकशी करण्यात यावी आणि त्यामागच्या मूळ सूत्रधारांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

First Published on February 16, 2018 2:49 am

Web Title: development plan of mira bhayander leak mira bhayander municipal commissioner