ठाण्यातील २५ विकास प्रकल्पांच्या कामाचा शनिवारी आरंभ

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला कोंडीत गाठण्यासाठी सदैव आतुर असलेल्या शिवसेनेने ठाण्यात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हिरवा गालिचा अंथरला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबतच्या मनोमीलनानंतर येत्या शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तब्बल २५ विकास प्रकल्पांच्या शुभारंभ आणि पायाभरणीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा

भाजपचे काही स्थानिक नेते आणि शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर आणि काही वादग्रस्त धोरणांवर सातत्याने टीकेचे प्रहार केले जात असताना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे आवतण स्वीकारून एक प्रकारे जयस्वाल विरोधकांनाही सूचक इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, शहरातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार असल्याने बदलीच्या उंबरठय़ावर असलेल्या जयस्वाल यांना आणखी काही महिन्यांची मुदतवाढ मिळेल, असेही बोलले जात आहे.

ठाण्यात सुखाने कार्यभार करायचा असेल तर शिवसेनेशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही याची उपरती सध्या जयस्वाल यांना झालेली दिसते. काही दिवसांपूर्वी महापौर मीनाक्षी िशदे यांनी जयस्वाल यांचा उल्लेख हुकूमशहा असा केल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका मोठय़ा गटाकडून आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

भाईंदरपाडा येथील मैदान बिल्डरांना भाडेपट्टय़ावर देणे, कळव्यातील चौपाटीचे कंत्राट नियम डावलून ठरावीक ठेकेदाराला बहाल करणे, उपवन येथील खासगी जमीन फुटबॉल मैदानाच्या नावाखाली खासगी संस्थेस देणे यांसारख्या काही प्रस्तावांमुळे जयस्वाल सातत्याने वादात सापडत आहेत. मुल्लाबाग येथील भरवस्तीत स्मशानभूमी उभारणे तसेच शहरातील हॉटेलमालकांना दंड भरण्यासाठी जून महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने शिवसेना म्हणेल ते करण्यास जयस्वाल तयार होतात असे चित्र सातत्याने उभे राहिले आहे. जयस्वाल यांची विकासकामे काही ठरावीक बिल्डरांचे हित पाहून केली जात असल्याचे आरोपही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून यापूर्वी करण्यात आले आहेत. असे असताना येत्या शनिवारी शहरातील विविध विकासकामांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पाचारण करत जयस्वाल आणि शिवसेनेने शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.

जयस्वाल यांच्या साथीने शहराचा ‘विकास’ साधण्यासाठी येत्या शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेतेही आतुर झाले आहेत, तर शनिवारी जयस्वाल यांचा वाढदिवस असून शहरातील विकासकामांच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्र्यांनी हाच दिवस निवडल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

भाजपला कमीपणा दाखवण्यात आनंद

नव्या ठाण्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या घोडबंदर भागात महापालिकेने खासगी विकासकाच्या माध्यमातून उभारलेल्या वाहतूक पार्कचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून यानिमित्ताने चौपाटी विकास, रस्त्यांचे भूमिपूजन, सोलार प्रकल्प तसेच या आणि अशा इतर २५ प्रकल्पांचा शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या महापालिका वर्तुळात असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे भाजपला घरचा आहेर मिळणार असल्याने शिवसेना नेते सध्या खुशीत आहेत.