कोकण ‘पदवीधर’च्या प्रचारात मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला पुन्हा आव्हान

ठाणे जिल्हा हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता. युतीच्या राजकारणात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला आपण जिल्ह्य़ातील किल्ले एकएक करून बहाल करत गेलो. भाजपचे परंपरागत असे लोकसभा, विधानसभेचे मतदारसंघही आपण मित्रपक्षाला दिले. हे किल्ले ताब्यात घेण्याची मोठी संधी कोकण पदवीधर मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली असून, गेली अनेक वर्षे तुमच्या मनात असलेली खदखद बाहेर काढण्याची ही संधी सोडू नका, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकले. पालघर निवडणूकजिंकल्याने या विजयाचा राजकीय परिणाम राज्यातील राजकारणावर दिसून आला. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने असाच परिणाम निर्माण करता येऊ शकतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कोकण पदवीधर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपने जिल्ह्य़ातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शुक्रवारी ठाण्यात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीपूर्वी कोकण पट्टय़ातील पक्षाचे खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले.

कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीत विस्कळीत नियोजनामुळे हा मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक केवळ प्रतिष्ठेची नाही तर गतवैभव प्राप्त करण्यासाठी आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

..तर चित्र वेगळे असते

विधानसभा निवडणुकीत अवघे पंधरा दिवस मिळाले असतानाही आपण दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. या निवडणुकीसाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळाला असता तर  कोकणाचे चित्र वेगळे असते. ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांत आपल्या पक्षाची ताकद नेहमीच राहिली आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल, मीरा-भाईदर, उल्हासनगर महापालिकेत ताकद दाखवून दिली आहे. अशीच ताकद दाखविण्याची संधी कोकण पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आली असून जे आपण इतरांने दिले ते परत मिळविण्याची संधी सोडू नका असे आवाहन केले.