जागा मिळाली, पण दूरध्वनी क्रमांक नाही

 

Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

ठाणे : महापालिका क्षेत्रातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या दिवा भागात अग्निशमन केंद्रासाठी प्रशस्त जागा मिळाली. मात्र,   या केंद्रासाठी काही तांत्रिक कारणांमुळे नवीन दूरध्वनी क्रमांक मिळत नसल्याने नागरिकांना आगीची वर्दी देण्यासाठी मुंब्रा अग्निशमन केंद्र किंवा महापालिका आपत्ती निवारण कक्षाला संपर्क करावा लागत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या दिवा भागाची लोकसंख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. पाच लाखांहून अधिक लोकसंख्येचा टप्पा ओलांडलेल्या या भागासाठी महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी स्वतंत्र प्रभाग समिती स्थापन केली आहे. दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींमध्ये अनेकदा आगी लागण्याच्या घटना घडत असतात, तर कचराभूमीलाही वारंवार आग लागते.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागासाठी मुंब्रा अग्निशमन केंद्राअंतर्गत दिवा बीट अग्निशमन केंद्र सुरू केले. या बीट अग्निशमन केंद्रासाठी स्वतंत्र इमारत नसल्यामुळे अग्निशमन दलाचे शीघ्र प्रतिसाद वाहन दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोरच उभे करावे लागत होते, तर अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी या प्रभाग समिती कार्यालयातील एका खोलीत तात्पुरत्या कक्ष सुरू करण्यात आला होता.

अखेर महापालिका प्रशासनाने या बीट अग्निशमन केंद्रासाठी प्रभाग समितीच्या इमारतीशेजारी स्वतंत्र इमारत उभारली आहे. त्यामध्ये अग्निशमन दलाची वाहने उभी करण्यासाठी सुसज्ज शेड उभारण्यात आली आहे, तर अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नव्या इमारतीतून बीट अग्निशमन केंद्राचा कारभार नुकताच सुरू झाला आहे, अशी माहिती मुंब्रा अग्निशमन केंद्र अधिकारी पी. एम. मिश्रा यांनी दिली.

दूरध्वनी क्रमांकाच्या व्यवस्थेसाठी विलंब

या केंद्रासाठी स्वतंत्र दूरध्वनी व्यवस्था देण्याची मागणी एमटीएनएलकडे करण्यात आली आहे. मात्र, रस्ते रुंदीकरणाच्या कामात दूरध्वनी वाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे सध्या या ठिकाणी नवीन दूरध्वनी व्यवस्था उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याचे कारण एमटीएनएलकडून देण्यात आले आहे, असे पी. एम. मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे दिवेकरांना एखाद्या दुर्घटनेची तात्काळ माहिती द्यायची असल्यास मुंब्रा अग्निशमन केंद्र किंवा ठाणे महापालिका आपत्ती निवारण कक्षाला संपर्क करावा लागणार आहे.