गोग्रासवाडी, सागाव परिसरात धुराचे पट्टे

डोंबिवली पूर्व भागातील गोग्रासवाडी, एमआयडीसीच्या काही भागात रविवारी रात्री आठ वाजल्यापासून रासायनिक दरुगधीचा उग्र दर्प येत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. सागाव, मानपाडा, गांधीनगर परिसरात प्रदूषित धुराचे पट्टे तयार झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यामुळे रहिवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण होते. थंडीच्या दिवसात धुराचे पट्टे खाली राहत असल्याने प्रदूषण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रविवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर एमआयडीसी, गोग्रासवाडी भागात रासायनिक दरुगधीचा दर्प येऊ लागला. सुरुवातीला टायर, टय़ूब जाळल्यामुळे हा वास येत असल्याचा रहिवाशांचा समज झाला. पण नंतर दरुगधी येण्याचे प्रमाण वाढले. ज्येष्ठ, वृद्ध मंडळींना या उग्र दर्पाचा सर्वाधिक त्रास झाला. रात्री उशिरापर्यंत हा दर्प येत होता. सोनारपाडा, सागाव, गांधीनगर पट्टय़ात रविवारी सायंकाळी प्रदूषित धुराचे पट्टे तयार झाले होते. सध्या थंडी आणि हवा कुंद असल्याने वारा नाही. त्यामुळे धूर, प्रदूषणाचे पट्टे जागोजागी तयार होताना दिसत आहेत, असे एका जाणकाराने सांगितले.