News Flash

पाच दिवसांच्या चिमुरडीला फेकणाऱ्या आईला पोलीस कोठडी

काही दिवसांपूर्वी पाच दिवसांच्या चिमुरडीला रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकण्यात आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

| April 18, 2015 12:06 pm

काही दिवसांपूर्वी पाच दिवसांच्या चिमुरडीला रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकण्यात आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा अपघात नव्हता तर त्या चिमुरडीला तिच्या आईनेच खाली फेकल्याचे स्पष्ट झाले होते. चिमुरडीचा खुनाचा आरोप असलेली आई सुजाता गायकवाड हिला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
डोंबिवली पूर्वेतील फतेह अली रोडला शुभदा नर्सिग होममध्ये अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेण गावात राहणाऱ्या सुजाता गायकवाड या महिलेने ८ मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास एका मुलीस जन्म दिला. शस्त्रक्रियेद्वारे प्रसूति झाल्याने महिला आणि बालकाला पाच दिवस रुग्णालयातच देखभालीसाठी ठेवण्यात आले होते. १२ मार्चला सकाळी अचानक मुलगी बेपत्ता झाल्याने रुग्णालय आवारातच शोधाशोध सुरू झाली. रुग्णालयाच्या आवारात इमारतीखाली ती मृत अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामनगर पोलिसांनी हॉस्पिटलमधील परिचारिका, बालकाचे नातेवाईक यांची कसून चौकशी केली. मात्र कोणतेही धागेदोरे त्यांना सापडत नव्हते. मुलीच्या आईची मानसिकता ठिक नसल्याने पोलिसांना तपासात अडथळा येत होता. अखेर रामनगर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन तब्बल एका महिन्यांनी मुलीची जन्मदाती आई सुजाता हिला परिस्थितीजन्य पुराव्यावरून अटक केली. मुलगा न होता दुसरी मुलगी झाली म्हणून तिने आपल्या पोटच्या मुलीलाच हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिली. या गुन्ह्य़ात अन्य काही नातेवाईकांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रत्यक्ष मारेकरी सुजाता असल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यांवरून समोर आले असले तरी असे करण्यास तिला कुणी प्रवृत्त केले, याचा शोध घेण्याकरिता चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी पोलिसांनी मागणी केली होती. तथापी ही मागणी मान्य करत कोर्टाने आरोपी सुजाता हिला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 12:06 pm

Web Title: dombivali killer mother get police custody
टॅग : Police Custody
Next Stories
1 प्रचारसभांचा जोर ओसरला
2 सेंद्रिय खताने हिरवाईला बहर
3 पालिका प्रसूतिगृहांत डॉक्टरांची वानवा
Just Now!
X