|| नीरज राऊत

जिल्ह्य़ात केवळ ६८ टक्केच पेरणी; जव्हार, मोखाडय़ात कमी लागवड

यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या लागवडीवर झाला आहे. पाण्याची कमतरता असल्याने जिल्ह्य़ात रब्बीचे एकूण ६७.८० टक्के पेरणी झाली असून जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे. मोखाडय़ात २० तर जव्हारमध्ये अवघी पाच टक्के रब्बी पिकांची लागवड झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

पालघर जिल्ह्य़ात हरभऱ्याची २,१६३ हेक्टरवर लागवड क्षेत्र असून यंदा केवळ ६४ टक्के हरभऱ्याची लागवड झाली आहे. जिल्ह्य़ात सव्वाशे हेक्टरवर गव्हाचे लागवड क्षेत्र असून यंदा खूप तुरळक प्रमाणात गव्हाच्या शेतीकडे शेतकरी वाळलेला दिसतो. मका, सूर्यफूल आणि अन्य गळीत पिकांची यंदाच्या रब्बी हंगामात लागवड झाली नसल्याचे दिसून येत आहे. वाडा, पालघर आणि वसई तालुक्यांमध्ये हरभरा, तीळ तसेच इतर कडधान्यांची लागवड केल्याचे दिसून येत असून इतर तालुक्यांमध्ये प्रामुख्याने हरभरा लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. जिल्ह्य़ामध्ये ५,५२० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी डिसेंबरच्या मध्यापर्यंत ३,७४२ हेक्टर रब्बीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. एकंदर दुष्काळी परिस्थितीचा फटका रब्बी पिकांवर पडला असून यंदा कमी पीक येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

यंदा ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ापासून कमी पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला, तर परतीचा पाऊसच झाला नाही. याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला आहे. तरीही जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी हिंमत दाखवून हरभरा पिकाची पेरणी केली. जिल्ह्य़ात ७० टक्के पेरणी झाली आहे.  – काशिनाथ तरकसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर

यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी होते. परतीचा पाऊसही पडला नाही. परिणामी मातीतला ओलावा अत्यंत कमी प्रमाणात आहे.  अनेक शेतकऱ्यांना हरभरा, वाल, मूगाची पेरणी अधिक प्रमाणात करता आली नाही. यंदा थंडीही सुरू न झाल्याने पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दवाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा फटका रब्बी पिकाला बसणार आहे.    – अनिल पाटील, शेतकरी