किशोर कोकणे

ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ रिक्षा प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने ठाणे शहरात प्रथमच ई-रिक्षा धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आखलेला खासगी ई-रिक्षाचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून तो चार-पाच दिवसांत सुरू होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने या रिक्षांसाठी खास थांबा निश्चित केला असून ठेकेदारामार्फत येत्या चार ते पाच दिवसांत प्रयोगिक तत्त्वावर बॅटरीवर चालणाऱ्या ३० रिक्षा शहरात धावतील, असे नियोजन आहे. या रिक्षासेवेचा भाडेदर परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरांप्रमाणेच असेल.

या रिक्षांना चार्जिगसाठी चार्जिग केंद्रावर थांबण्याची गरज नाही. रिक्षाची बॅटरी संपल्यास अवघ्या एका मिनिटांत ती बदलून पुन्हा रिक्षा सुरू करता येईल. येत्या चार-पाच दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर ३० रिक्षा शहरात धावणार आहेत. या उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यास चार ते पाच महिन्यांत शेकडो रिक्षा शहरात धावू शकतील, अशा पद्धतीचे नियोजन आहे.  ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करत असतात. स्थानकाच्या पश्चिमेकडून प्रवासी बाहेर पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्थानकाच्या पश्चिमेला ठाणे महापालिकेने रिक्षा थांबाही उभारला आहे. मात्र, अनेकदा या थांब्याबाहेर रिक्षाचालक येऊन प्रवाशांची वाट अडवीत असतात. नव्याने ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांना मीटरपेक्षा जादा दर आकारून लुटण्याचे प्रकारही शहरात घडले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात उतरल्याक्षणी रिक्षांचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

या रिक्षा उभ्या करण्यासाठी स्थानक परिसरातील वाहनतळाजवळ जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी ई-रिक्षांच्या बॅटरीही चार्ज करण्यात येतील. या रिक्षासेवेमुळे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीलाही आळा बसू शकेल.

यंत्रणा अशी..

* या सेवेतील रिक्षा ‘लीथ पावर’ कंपनीच्या असतील. या रिक्षामध्ये चार बॅटऱ्या वापरण्यात येणार आहेत. बॅटरी एकदा चार्च केल्यानंतर ती ६० किलोमीटपर्यंत चालेल.

* बॅटरी संपल्यानंतर ती ठाणे स्थानक, तीन पेट्रोल पंप आणि मानपाडा कोठारी कंपाऊंड येथील केंद्रावर अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदलणे शक्य होणार.

* एखादी रिक्षा रस्त्यात बंद पडल्यास अवघ्या १५ ते २० मिनिटांत कंपनीचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होईल. बॅटरीवरील या रिक्षांमुळे प्रदूषणही होणार नाही.

परवान्याची गरज नाही : ई-रिक्षा चालविण्यासाठी

परवान्याची गरज नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना बॅज आणि रिक्षा चालविण्याच्या परवान्याच्या आधारे, रिक्षा चालविता येणार आहे. या रिक्षांचे भाडे मीटर रिक्षांप्रमाणेच असेल. या रिक्षांमधील प्रवाशांसाठी असणार आहे. सध्या या रिक्षांना ठाणे स्थानकाबाहेरील वाहनतळाजवळ थांबा देण्यात आला आहे.

या रिक्षांमुळे शहरात प्रदूषण होणार नाही. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास लवकरच शेकडो रिक्षा शहरात धावू शकतील.

– रोहित पंडित, संचालक, लीथ पावर प्रा. लि.

रेल्वेने या प्रकल्पासाठी जागा दिली आहे. तेथे रिक्षाची बॅटरी चार्जिग करण्यासाठी केंद्रही असेल.

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे