News Flash

कल्याणमध्ये ‘ई-कचरा’ प्रकल्प

‘ई कचरा’ प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे

ई-कचरा प्रकल्पाचे प्रातिनिधिक छायाचित्र.  

महापालिकेचा प्रस्ताव; प्रदूषण रोखण्यास हातभार; ‘बांधा, वापरा आणि ताबा द्या’ तत्त्वावर उभारणी

आधारवाडी क्षेपणभूमीवर साठवण झालेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच, नव्याने जमा करण्यात येणारा ओला, सुका कचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने विघटन करण्याचे प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या प्रकल्पांबरोबरच ‘ई-कचरा’(ई-वेस्ट) प्रकल्प उभारण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरूकेल्या आहेत.

शहरात दैनंदिन तयार होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येत असतानाच, प्लॅस्टिक, रबर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे टाकाऊ भाग यांचा उपद्रव वाढू नये. हाही ‘ई कचरा’ प्रकल्प निर्मितीमागचा उद्देश आहे. अलीकडे भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप अशा इलेक्टॉनिक्स वस्तुंचा वापर बेसुमार वाढला आहे. या वस्तु बिघडल्या की, त्या कचऱ्यात टाकल्या जातात. ओला, सुका कचऱ्यामध्ये या नवीन कचऱ्याची अडचण नको म्हणून ‘ई कचरा’ प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे, असे कल्याण डोंबिवली पालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सांगितले.

ई कचरा’ प्रकल्प दोन एकर जागेत उभारणार आहे. जागा निश्चित करण्याचे काम सुरु आहे. शहरातील सर्व ‘ई कचरा’ या केंद्रावर जमा करण्यात येऊन त्याच्यावर प्रक्रिया करण्यात येईल. ‘ई कचऱ्याची’ एकाच ठिकाणी विल्हेवाट लावल्याने, या कचऱ्यापासून जे प्रदूषण तयार होते ते रोखण्यात साहाय्य होईल. हा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि ताबा द्या’ (बीओओ) तत्वावर उभारण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात देऊन स्पर्धात्मक प्रक्रियेतून अभिकरण नेमण्यात येणार आहे. कचरा वेचक, काही खासगी संस्थांच्या माध्यमातून ई कचरा जमा करण्याचे काम करून घेण्यात येईल. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला अभिकर्त्यांकडून देण्यात येईल. अभिकरणाकडून ‘ई कचरा’ प्रकल्पाची उभारणी करण्यात येईल. कचरा जमा करणे, त्याची वाहतूक आणि त्यावर प्रक्रिया करणे ही सगळी कामे पालिकेच्या नियंत्रणाखाली अभिकर्ता करेल. पालिकेला एक पैशाचा खर्च न करता स्वामीत्वधनाची रक्कम काही प्रमाणात अभिकरणाकडून मिळेल. शहरातील ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबच पालिकेला महसुलाचा एक नवीन स्त्रोत या माध्यमातून उपलब्ध होणार आहे, असे घरत यांनी स्पष्ट केले.

टिटवाळा येथे पालिकेने गांडुळखत प्रकल्प सुरु केला आहे. मंदिर परिसरातील निर्माल्याचे या प्रकल्पात खत तयार करण्यात येणार आहे. पालिका हद्दीत जी मोठाली देवस्थान आहेत. त्यांच्याशी संपर्क करुन त्यांनी त्यांच्या जागेत गांडुळखत प्रकल्प राबवावेत, यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.

येणाऱ्या काळात कचरा ही समस्याच शहरात राहणार नाही. अशा पध्दतीने प्रशासनाने कचरा प्रकल्प राबविण्याचे निर्णय घेतले आहेत. ओला, सुका कचरा, ई कचरा, वैद्यकीय कचरा त्या त्या प्रकल्पात विघटित केले तर, कचऱ्याची कोणतीच समस्या निर्माण होणार नाही. तसेच, कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण, त्यानंतरचे साथीचे आजार पूर्णपणे आटोक्यात आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासन हे सुमारे एकूण साठ कोटीचे प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे.

संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 2:00 am

Web Title: e waste projects in kalyan
टॅग : Kalyan,Projects
Next Stories
1 अंबरनाथ-बदलापूर महापालिका स्थापनेची पूर्वतयारी
2 बदलापूरच्या स्कायवॉक स्वच्छतेला अखेर सुरुवात
3 वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या काळातही दुबार पीक
Just Now!
X