ठाणे, कल्याण परिसरावर एके काळी शिलाहार राजांची सत्ता होती. शिवप्रेमी असणाऱ्या शिलाहार राजांनी या परिसरात विविध शिवमंदिरे बांधली. त्या मंदिरांपैकी सर्वात प्राचीन आणि स्थापत्यशास्त्राचे सवरेत्कृष्ट उदाहरण म्हणजे अंबरनाथ येथील शिवमंदिर. वालधुनी नदीच्या तटावर उभे असलेले हे हेमाडपंथी मंदिर म्हणजे शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना. खडकांमध्ये कोरलेल्या या मंदिरावर अनेक देव-देवतांची शिल्पे आढळतात.. या आरसपानी सौंदर्याकडे पाहिले की बस्स पाहतच राहावेसे वाटते.
युनेस्कोने जाहीर केलेल्या २९८ कलासंपन्न वास्तूंत अंबरनाथच्या या शिवमंदिराचा समावेश आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत. या मंदिराच्या बाह्यांगाला सभोवती अनेक शिल्पे आढळतात. हत्ती, नंदी, त्रिशुल घेतलेला शंकर, पार्वती, शिवलिंग, गणपती, वराहरूढ विष्णू, लक्ष्मी, ब्रह्मदेव अशा अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर शिव-पार्वती विवाह व नृत्याचे आविष्कार दाखविणारी आणि शृगांरिक कामशिल्पे या मंदिरावर आहेत. पायापासून शिखरापर्यंत हे मंदिर नखशिखांत आरसपानी सौंदर्याने नटलेले आहे. बाहेरून हे मंदिर पाहिले की जणू काही एखादा रथच तिथे उभा आहे, असा आभास होतो.
प्रवेशद्वारातून आत मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असून त्यामध्ये जाण्यासाठी २० पायऱ्या उतराव्या लागतात. गाभाऱ्यात दोन शिवलिंग आहेत. एक काळय़ा पाषाणाचे तर एक पांढऱ्या रंगाचे शिवलिंग आहे. या गाभाऱ्यात प्रकाश पडावा म्हणून शिखरावर मोकळी जागा करण्यात आली असून, त्यावर जाळी आहे. त्यातून सूर्यप्रकाश शिवलिंगावर पडतो.
मंदिराच्या आतील सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच. खांबांवर उत्कृष्ट नक्षीकाम आहे. सभामंडपातील झुंबर, घुमट यांचे नक्षीकामही सुंदर आहे. या मंदिरातील शिल्पे निवांतपणे व न्याहाळून पाहण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एक शिलालेख आढळतो. या शिलालेखामध्ये हे मंदिर शिलाहार राजा चित्तरराजा याने इ. स. १९६०मध्ये बांधल्याचा उल्लेख आहे. चित्तरराजा यांचा मुलगा मुम्मुनी याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. महाराष्ट्र सरकारनेही १९९९मध्ये या शिल्पसौंदर्याने नटलेल्या शिवमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात या मंदिराचा शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते.
एके काळी या मंदिराभोवती दाट वनराई होती. घनदाट जंगलाचा परिसर असलेल्या या परिसरात शिलाहार राजाने मंदिर उभारले होते. मात्र काळाच्या ओघात वनराई नष्ट झाली. या मंदिराभोवती बगिचा वसविण्यात आला आहे. त्यामुळे येथे हिरवाई टिकून आहे. मात्र वालधुनी नदीला गचाळ स्वरूप आले आहे. या नदीत भाविक निर्माल्य, कचरा टाकत असल्याने या नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. नदीच्या पात्रातच बांधकाम केल्याने नदीचे सौंदर्य आटले आहे. त्यामुळे या परिसरात दरुगधी व गचाळपणा आहे. पण तरीही शिल्पश्रीमंतीचा हा उत्कृष्ट नमुना पाहायचा असेल तर या मंदिराला भेट देणे आवश्यकच आहे.
कसे जाल?
शिवमंदिर, अंबरनाथ
अंबरनाथ स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी अंबरनाथ स्थानकाजवळून रिक्षाची सोय आहे.

actress raveena tondon marathi news
‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे
firing at ram mandir ayodhya
अयोध्या : राम मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात PAC जवान गोळी लागून जखमी, परिस्थिती गंभीर