कुळगाव-बदलापूरच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका आढळल्या असून सोमवारी सकाळपर्यंत तब्बल २३ हजार १७८ हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस १७ मार्च रोजी असल्याने आणखी पाच-सहा हजार हरकती दाखल होण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कुळगाव-बदलापूर निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी २० मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने अवघ्या चार दिवसांत पालिका कर्मचाऱ्यांना या हरकतींचा निपटारा करावा लागणार आहे. या कामासाठी ४० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक हरकतीसाठी मतदाराच्या घरी जाऊन  तिची सत्यता पडताळावी लागत आहे.  
दुसरीकडे, अंबरनाथमध्येही सोमवार सकाळपर्यंत सहा हजार ३०० हरकती आल्या आहेत. पालिकेतील एका प्रभागातील नावे ही दुसऱ्या प्रभागात गेल्यावर हरकती घेण्यात येत असल्या तरी बदलापूर व अंबरनाथच्या हद्दीबाहेरील नावे घुसली आहेत, त्यांच्यावर हरकत घेणार कशी? हा मुद्दा उपस्थित झाला आहे. कारण ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने अशाप्रकारच्या नावांवर हरकती घेणेच शक्य होत नाही. त्यातच हरकतींचा     निपटारा करण्यासाठी फारच कमी कालावधी असल्याने आता राज्य निवडणूक आयोगानेच यात लक्ष घालावे, अशी मागणी बदलापूर व अंबरनाथमधून होत आहे.

आदिवासींची ‘घुसखोरी’
बदलापुरातील प्रभाग क्र. ४५ च्या शिरगाव वाजपे या प्रारूप मतदार यादीत येथून किमान सहा ते सात किलोमीटर लांब असलेल्या बेंडशीळ पाडा, चापेवाडी, चामटोली पाडा येथील आदिवासी पाडय़ावरील लोकांची नावे असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रभागाच्या प्रारूप यादीत अनु क्र. ११०३ ते ११४९ व १२६० ते २१२२ या क्रमांकांची नावे ही आदीवासी पाडय़ांवरील नागरिकांची आहेत. पालिकेतील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार विधानसभेच्या यादीत ही नावे असून ती मुरबाड तहसील कार्यालयातून आम्हाला प्राप्त झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडूनच नजरचुकीने ही नावे घुसल्याचे बोलले जात आहे.