ठाण्यात पादचाऱ्यांसमोर नवा अडथळा

उत्सवांच्या काळात रस्त्यांवर किंवा पदपथावर मंडप उभारून पादचारी तसेच वाहनांची अडवणूक दरवर्षी होत असताना यंदा मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांनीही अशी अडवणूक सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या एक महिना अगोदरपासून शहरातील विविध भागांत गणेशमूर्ती तयार करण्याचे तसेच विक्रीचे कारखाने रस्ते आणि पदपथांवर उभे केले जाऊ लागले आहेत. ठाण्यातील माजीवडा, पोखरण रोड, नितीन कंपनी जंक्शन यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्ती कारखाने सुरू झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन पदपथावरून चालण्याची सोयही उरलेली नाही.

गणेशोत्सवाला आता जेमतेम महिना शिल्लक असताना ठाण्यात गणेशमूर्ती तयार करणारे कारखाने तसेच विक्री करणाऱ्या मूर्तीशाळांची संख्या वाढू लागली आहे. यातील अनेक कारखाने रीतसर परवानग्या घेऊन अधिकृत जागेत सुरू आहेत. मात्र, यंदा अनेक भागांत रस्त्यांवर किंवा पदपथावर अतिक्रमण करून गणेशमूर्ती विक्रीची केंद्रे सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मी पार्क मार्ग, देवदयानगर, पोखरण रोड, माजीवाडा, कापूरबावडी, नितीन जंक्शन सेवा रस्ता या भागांत गणेशमूर्ती तयार करण्याच्या अशा कारखान्यांनी बस्तान मांडल्याचे दिसून येत आहे.

देवदयानगर भागात बेथनी रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला मुख्य चौकातच असाच एक गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरु करण्यात आला आहे. मुख्य चौकातच उभारण्यात आलेल्या या कारखान्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. परिसरात अनेक शाळा आहेत. त्यामुळे या मार्गावरून शालेय वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे शालेय विद्यार्थीही कारखान्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकून पडतात. नितीन जंक्शन भागातील सेवारस्त्याजवळील पदपथावरही असाच कारखाना थाटण्यात आला आहे. पोखरण क्रमांक दोन येथे मुख्य चौकात बस थांब्याजवळच गणेशमूर्तीचा कारखाना उभारण्यात आला आहे. त्यामुळे बस थांब्यांवर बस थांबण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. २० ते ३० फूट लांबीच्या आकाराचे हे कारखाने आहेत. ताडपत्री तसेच लाकडी बांबूंच्या आधाराने हे कारखाने उभारण्यात आले आहेत.

प्लास्टिकचाही वापर

राज्यभर प्लास्टिक पिशव्यांना बंदी असताना, शहरातील गणेशमूर्तीच्या कारखान्यांमध्ये मात्र ही प्लास्टिकबंदी लागू झालेली दिसून येत नाही. कारखान्यात तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तीना प्लास्टिक पिशव्यांनी झाकण्यात आलेले आहे.

पथदिव्यांतून वीजजोडणी

गणेश मूर्तीच्या कारखान्यात रंगकाम, प्रकाश या सर्वासाठी मोठय़ा प्रमाणावर विजेचा वापर केला जातो. मात्र रस्ते आणि पदपथावर उभारण्यात आलेल्या या गणेशमूर्तीच्या कारखान्यात विजेचा पुरवठा हा आजूबाजूच्या पथदिव्यांतून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काम करताना कामगार कोणतीही सुरक्षा घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखानदार महापालिकेच्या नियमावलीला अनुसरून रीतसर अर्ज करून परवानगी मागत असतील, अशा गणेशमूर्ती कारखानदारांना कारखाने उभारण्यास महापालिकेची परवानगी आहे. मात्र अवैधरीत्या रस्त्यांवर गणेशमूर्तीचे कारखाने उभारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत आहे. गेल्या आठवडय़ात अशाच परवानगी न घेतलेल्या तीन गणेशमूर्ती कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

-अशोक बुरपल्ले, उपायुक्त ठाणे महानगरपालिका