मुख्य रस्त्यावर पथदिवे नसल्याने अपघाताची शक्यता

वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटीच्या परिसरातील अंबाडी पुलाखालील रस्त्यावर पथदिव्यांची सोय नसल्याने अंधार पसरला असून यामुळे अपघातांची शक्यता वाढलेली आहे. सध्या जुना अंबाडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने एका पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्या वाहतूक कोंडीचीही भर पडली आहे.

वसई पूर्वे आणि पश्चिमेला जोडणारा अंबाडी पूल आहे. अंबाडी पुलाच्या पूर्वेकडील रस्त्याने थेट महामार्गाला जोडला गेला आहे. मात्र या रस्त्यावर पथदिव्यांची सोय केलेली नाही. त्यामुळे अंधार पसरलेला आहे. वसंत नगरी, एव्हरशाइन सिटी, गोखिवरे, सातिवली आदी निवासी आणि औद्य्ोगिक वसाहती या भागात आहेत. त्यांच्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने अपघांची शक्यता वाढते. त्यातच पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. जुना अंबाडी पूल दुरुस्तीसाठी रेल्वेने बंद ठेवला आहे.

सर्व वाहतूक नव्या पुलावरून वळविण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची भर पडलेली आहे. एव्हरशाइन सिटी आणि वसंत नगरीच्या रहिवाशांनी अनेकदा पालिकेकडे याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र अद्याप निधी नाही असे सांगून रहिवाशांची बोळवण केली जाते, असे स्थानिक रहिवाशी राज दसोनी यांनी सांगितले.