ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई; मध्य प्रदेशात पिस्तूल निर्मितीचा पिढीजात व्यवसाय

मातीत बियाणं रुजवून भरघोस पीक घ्यायचं सोडून पिस्तुलांची पैदास करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. मुकेश चौहान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भिवंडी येथील कोनगाव परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात असताना पोलिसांनी चौहान याला अटक केली. मुकेश हा मध्य प्रदेशातील मूळचा शेतकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शस्त्रनिर्मितीचा चौहान कुटुंबाचा पिढीजात व्यवसायआहे. शस्त्रनिर्मितीत निपुण असलेल्या मुकेशचे कुटुंबीय दलालाचा शोध घेऊन त्यांना चार ते पाच हजारांना उत्तम दर्जाचे पिस्तूल तयार करून विकत असत. मात्र, हेच दलाल या शस्त्राची मुंबईत दीड ते दोन लाखांना विक्री करतात हे कळताच मुकेशनेही मुंबईत शस्त्र विक्री करण्याचा निर्णय घेतला. घरात लग्नकार्य असल्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासत होती आणि यातूनच तो ठाण्यामध्ये पिस्तूल विक्रीसाठी आला होता. मुकेशच्या अटकेमुळे परराज्यातील शस्त्र निर्मिती आणि विक्रीतील दलालांची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वंडी येथील कोनगाव परिसरात मुकेश भावला चौहान (२०) हा गावठी पिस्तूल विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कदम आणि पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी गेल्या शनिवारी सापळा रचून त्याला अटक केली. तसेच त्याच्याकडून चार गावठी पिस्तुले, चार रिकाम्या मॅगझीन आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मुकेश चौहान हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील खरगुन जिल्ह्य़ातील दगडखेनी गावचा रहिवासी असून या गावामध्ये तो शेती व्यवसायासोबतच शस्त्र बनविण्याचे काम करतो, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

मध्य प्रदेशातील एका समाजाचा शस्त्र बनविण्याचा परंपरागत व्यवसाय असून मुकेश चौहान हा त्याच समाजातील आहे. त्याचे पूर्वज ब्रिटिश काळापासून शस्त्र बनविण्याचे काम करीत होते. तेच काम तो आता करत असून त्यासोबत शेती व्यवसायही करतो.पिस्तुलाचे वेगवेगळे भाग बनविण्याचे काम त्याचे कुटुंबीय करतात आणि त्यामध्ये प्रत्येकजण तरबेज आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. घरात लग्नकार्य असल्यामुळे त्याला पैशांची गरज होती. ती भागविण्यासाठी त्याने पिस्तूल विक्रीचा निर्णय घेतला होता.