तीन महिन्यांपासून नादुरुस्त; गाडीचे सेन्सर खराब

मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची अत्याधुनिक गाडी गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत उभी आहे. या गाडीवर क्षमतेपेक्षा अतिरिक्त बोजा देण्यात आल्याने गाडीचे सेन्सर खराब झाले आहेत, त्यामुळे चौदाव्या माळ्यापर्यंत सेवा देणारी ही गाडी पूर्ण क्षमतेने काम करेनाशी झाली आहे. परिणामी, एखाद्या बहुमजली इमारतीत दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला त्याठिकाणी या गाडीचा सध्या तरी उपयोग करणे अशक्य होऊन बसले आहे.

मीरा-भाईंदर शहरात बहुमजली इमारती उभ्या राहू लागल्याने एखादी दुर्घटना घडल्यास वरच्या मजल्यापर्यंत जाणारी शिडी असणारी अत्याधुनिक गाडी खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. त्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची ‘टर्न टेबल लॅडर’ ही चौदाव्या माळ्यापर्यंत पोहोचणारी अत्याधुनिक गाडी महापालिकेने खास जपानहून मागवली. या गाडीवर संगणकाच्या साहाय्याने चालणारी शिडी बसविण्यात आली . मंत्रालयाला लागलेल्या आगीत मीरा-भाईंदर महापालिकेच्या या शिडीने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. ही गाडी सध्या अग्निशमन दलाच्या भाईंदर पश्चिम येथील केंद्रात नादुरुस्त अवस्थेत उभी आहे. ही गाडी सुरू असली तरी तिचे सेन्सर खराब झाले असल्याने ती कोणत्याही क्षणी बंद पडत असल्याने तिचा वापर करणेही धोकादायक आहे.

क्षमतेपेक्षा अतिरिक्त बोजा

गाडीवर बसविण्यात आलेल्या शिडीच्या एका टोकाला इमारतीत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बकेट बसविण्यात आली आहे. ही बकेट केवळ अडीचशे किलो एवढय़ाच वजनाचा भार घेऊ शकते, परंतु तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या एका कार्यक्रमासाठी या गाडीचा वापर करण्यात आला असता शिडीच्या बकेटमध्ये नेत्यांसोबत कार्यकर्त्यांनीही गर्दी केली. बकेटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे झाल्याने त्याचे सेन्सर खराब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे सेन्सर अद्याप बदलण्यात न आल्याने गाडीचा पूर्ण क्षमतेने वापर करणे अशक्य होऊन बसले आहे. गाडी सुरू असताना सेन्सरअभावी शिडी मध्येच अचानक अडकून बसते.

करदात्या जनतेच्या पैशांशी प्रशासनाचा हा खेळ सुरू असून याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

– मीलन म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते

ही अत्याधुनिक गाडी जपानमधून मागविण्यात आली आहे. त्यामुळे तिचे सुटे भागदेखील जपानमध्येच मिळत असल्याने खराब झालेले सेन्सर तसेच टायर कंपनीकडून मागविण्यात आले आहेत. सुटे भाग येताच ते तातडीने बदलण्यात येतील.

– डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, महापालिका