पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडयांच्या डब्यांचे नूतनीकरण

पश्चिम रेल्वेच्या मुंबई ते अहमदाबादपर्यंत दैनदिन लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रथम श्रेणीचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. गेली काही वर्षे अधिक पैसे मोजूनही चांगल्या सुविधा मिळत नव्हत्या. आता या डब्यांचे नूतनीकरण करण्यात येत असून सोयीसुविधा व आरामदायी डबे या गाडय़ांमध्ये टप्प्याटप्प्याने सेवेमध्ये येत आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊ न सामान्य दर्जाच्या डब्यांना परिवर्तित करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नूतनीकृत केलेले काही डबे तयार झाले आहेत. सोमवारपासून (दि. १७) वांद्रे -सुरत दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटीला ते जोडण्यात आले आहेत. वारली चित्रांनी हे डब्बे सजले असून त्यामध्ये प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या अनेक सुविधा पुरविण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये म्हटले आहे. येत्या काही दिवसांत हे डबे फ्लाईंग राणी व वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडय़ांना जोडण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेने प्रथम श्रेणीच्या डब्यांची नव्याने निर्मिती (उभारणी) बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. तसेच सेवेत असलेल्या या डब्यांचे आयुष्यमान संपत आल्याने त्यांना सेवेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे मुंबई-सुरत, मुंबई-वलसाड, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-सौराष्ट्र या दरम्यान धावणाऱ्या लांब व मध्यम पल्ल्यांच्या अनेक गाडय़ांना स्लीपर किंवा सामान्य दर्जाच्या डब्यांना ‘वाईस फस्र्ट क्लास’ असे संबोधन वापरले जात होते. या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये दैनंदिन (अप-डाऊन करणारे) प्रवाशी प्रवास करीत असत. वाईस फर्स्ट क्लास आणि सामान्य डब्यांमध्ये वेगळेपणा नसल्याने अनेक सामान्य प्रवासी अनेकदा प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये शिरत असत. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रकार घडत. प्रथम श्रेणीच्या प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत असे. याबाबत प्रवासी संघटना व प्रवाशांनी पश्चिम रेल्वे व्यवस्थापनाकडे अनेकदा तकारी केल्या होत्या.

कसे असायचे वाईस फर्स्ट क्लासचे डबे?

प्रथम श्रेणीच्या डब्यांचे आयुष्यमान संपल्यानंतर त्यांना सेवेतून बाहेर काढणे रेल्वे सुरसक्षितेतेच्या दृष्टिकोनातून अनिवार्य होते. नवीन डब्यांची उपलब्धता नसल्याने वापरात असलेले गादीवाले (कुशन) सर्वसाधारण डबे किंवा स्लीपर (३ क्लास)च्या डब्यांना त्याच स्थितीत वाईस फर्स्ट क्लास म्हणून नामकरण करण्यात आले होते. काही डब्यांना व्हीसी अशी पाटी असायची तर काही डब्यांच्या प्रवेशाजवळ लोकल गाडय़ांच्या प्रथम दर्जाच्या डब्यांप्रमाणे पट्टे मारले होते. वाईस फर्स्ट क्लास डब्यात आणि सर्वसाधारण डब्यातील सुविधेत कोणत्याही प्रकारचा फरक नसल्याच्या तक्रारी प्रवाशी करीत होते.

नूतनीकृत डब्यांमधील सुविधा

* सुधारित शौचालय

* सर्व आसनांना ‘कुशन’ (नरम गादी)

* स्टेनलेस स्टीलचे रॅक व बेसिन

* स्टेनलेस स्टील गार्डचे पंखे

* एलईडी लाइट

* बायो टॉयलेट

दैनंदिन प्रवाशांच्या वापरातील गाडय़ांमधील प्रथम श्रेणीच्या डब्यांची अवस्था खराब असून चांगली सुविधा मिळावी याकरिता प्रवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस व अहमदाबाद पॅसेंजर गाडय़ांमध्ये देखील नूतनीकृत प्रथम दर्जाचे डबे जोडण्यात यावेत.

– शिल्पा जैन, प्रवासी, पालघर