आयुक्तांच्या आदेशानंतरही अभियंता विभागाचे आस्ते कदम
गणेशविसर्जनापूर्वी ठाण्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असतानाही मंगळवारी अनेक मार्गावरून गणरायाची विसर्जन मिरवणूक खड्डय़ांतून हिंदकाळतच न्यावी लागणार आहे. वागळे, कोपरी, माजीवडा, बाळकूम यांसारख्या परिसरासह महामार्गावरील उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यात यंत्रणांना सोमवारी सायंकाळपर्यंत यश आले नव्हते. गेल्या दीड महिन्यांपासून शहरातील वेगवेगळ्या भागांत खड्डे कायम असूनही अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय दिले गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
पावसाची संततधार कमी झाल्यामुळे तातडीने खड्डे भरण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिकेने केला. प्रभाग समिती स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही खड्डे बुजविण्यासाठी प्रभागात उपस्थित राहावे, असे आदेशही आयुक्तांनी काढले. परिमंडळ उपायुक्त, कार्यकारी अभियंता आणि साहाय्यक आयुक्त यांनाही प्रभागांमध्ये फिरून पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, हे सर्व सुरू असताना पालिकेच्या अभियांत्रिकी विभाग मात्र सुस्त बसून राहिल्याचे दिसून आले. सोमवारी सायंकाळपर्यंत वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२, इंदिरा नगर, साठे नगर, कोलशेत, कोपरी, माजीवडा, बाळकूम सह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असल्याचे पाहायला मिळाले. यापैकी काही रस्त्यांवर महापालिकेने खड्डे बुझविण्यासाठी खडी टाकून डांबरीकरण केले होते. मात्र, ही खडी बाहेर निघाल्याने या रस्त्यांवरील प्रवास अधिक खडतर झाला आहे.
बाळकूम येथील साकेतकडे जाणारा आणि कशेळी टोलनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट बनली आहे. तसेच कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता अक्षरश: खड्डय़ात गेला आहे. येथील रस्ता दुरुस्त करणे महापालिकेस जमले नसल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होती. गणेशोत्सवापूर्वी येथे खडी टाकण्यात आली होती, मात्र येथे पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे येथील रहिवासी राजेश गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे उपायुक्त संदीप साळवी यांच्याशी संपर्क केला असता, ‘दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुन्हा खड्डे पडले आहेत. मात्र, खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे’, असे ते म्हणाले.
विसर्जन घाटालगत खड्डे
पालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती समोरच मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथेही १० दिवसांपूर्वी खड्डे बुझविण्याचे काम सुरू होते. मात्र, खड्डय़ांसाठी व्यवस्थित डांबरीकरण करण्यात न आल्याने समितीच्या प्रवेशद्वारा समोरच खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे गणेशविसर्जन घाटाला लागून असल्याने येथे परिसरातील मंडळांचे चांगलेच हाल होणार आहेत.
अपघातांचीही भीती
पूर्व द्रुतगती महामार्गावरील ज्युपीटर रुग्णालयाजवळ आणि घोडबंदर मार्गावरील माजीवडा नाक्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांची खोली मोठी असल्याने मोठय़ा अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घोडबंदर रस्त्यावरील खड्डे ब्लॉक घालून बुजविण्यात आले होते. मात्र, पावसात हे ब्लॉक पुन्हा निघून ते रस्त्यावर इतरत्र पसरले आहेत.