ओला, सुका वर्गीकरण करण्यासाठी मीरा-भाईंदर पालिकेची सक्ती

कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करणे आवश्यक असल्याचा दट्टय़ा शासनाकडून आल्यानंतर आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सोमवारपासून कचरा वर्गीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून न देणाऱ्या रहिवासी सोसायटय़ांच्या इमारतींची नळजोडणी खंडित करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

‘घनकचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम-२०१६’नुसार घनकचरा निर्माण करणाऱ्याने ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांकडे कचरा देतानाच तो स्वतंत्रपणे देणे अपेक्षित आहे. परंतु ही बाब आजपर्यंत नागरिकांनीही गांभीर्याने घेतलेली नाही, तसेच नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल याकडे प्रशासनानेही लक्ष दिलेले नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मेपासून कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. शिवाय महापालिकेने उत्तन येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारालाही ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे देणे आवश्यक झाले आहे. या पाश्र्वभूमीवर १ मेपासून रहिवासी सोसायटय़ांनी ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे द्यावा, अशा आशयाच्या अंतिम नोटिसा पालिकेने बजावण्यास सुरुवात केली आहे, तसेच १ तारखेपासून तो स्वतंत्रपणे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीदेखील नागरिकांना कचरा वर्गीकरण करून देण्याचे आवाहन केले होते. वर्गीकरण न केल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशाराही दिला. याप्रकरणी रहिवासी सोसायटय़ांच्या बैठका, जनजागृती मोहीम आदी उपक्रम प्रशासनाकडून राबविण्यात आल्या, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. मुख्य म्हणजे प्रशासनानेच ही बाब फारशी गांभीर्याने न घेतल्याने तसेच वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्र गोळा करण्याची व्यवस्थाच पालिकेकडे नसल्याने कचरा वर्गीकरणाची मोहीम सुरू होऊ शकली नाही.

आता मात्र कचरा वर्गीकरणाच्या मुद्दय़ावर पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

१ मेपासून ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सुका कचरा गोळा करण्यासाठी नेहमीच्या कचऱ्याच्या गाडय़ांसोबत अतिरिक्त २४ गाडय़ा महापालिकेने भाडय़ाने घेतल्या आहेत. रहिवासी सोसायटय़ांनी दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये ओला आणि सुका कचरा जमा करून ठेवायचा आहे. रहिवासी सोसायटय़ांनी कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही, तर सुरुवातीच्या काळात महापालिकेचे कर्मचारी त्यांचा कचराच  उचलणार नाहीत, असा इशारा पालिकेने दिला आहे.

यामुळे सोसायटीच्या आवारात तसेच रस्त्यावर कचरा साठून राहिल्यास आणि त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित सोसायटी जबाबदार असणार आहे. त्यानंतरही सोसाटय़ांनी असहकाराची भूमिका सुरूच ठेवली तर त्यांची नळजोडणी खंडित करण्याचे पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.

असे करा वर्गीकरण

  • ओला कचरा – स्वयंपाक घरातील कचरा, भाजीपाला, फळे, नारळाच्या करवंटय़ा, फुले, बागेतील कचरा, स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ असा विघटनशील कचरा.
  • सुका कचरा – प्लास्टिक, लाकूड, थर्माकोल, धातूच्या वस्तू, काच, रबर, रेगझीन, बाटल्या असा फेरवापर होणारा कचरा.
  • हा वेगवेगळा केलेला कचरा दोन वेगळ्या रंगांच्या डब्यांत इमारतीच्या आवारात ठेवण्यात यावा आणि तो सफाई कर्मचाऱ्यांकडे द्यावा.

महापालिकेच्या कोणताही कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या सहभागाशिवाय सफल होत नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात रहिवासी सोसायटय़ांमध्ये जनजागृती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन सर्व नगरसेवकांना करण्यात येणार आहे.

गीता जैन, महापौर