कला आणि शास्त्र यांचे अंतिम टोक एकच असून या दोहोंमध्ये यश संपादन करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. या मेहनतीच्या बळावरच मी शास्त्र म्हणून वैद्यकीय शिक्षण आणि संगीत ही कला शिकू शकले, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका डॉ. सुमन माटे यांनी केले. त्या ‘प्रतिभावंत बदलापूरकर’ या कार्यक्रमानिमित्त बोलत होत्या. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक श्रीराम केळकर यांनी काका गोळे फाऊंडेशन येथे घेतलेल्या या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
नमन नटवरा या नांदीने या मुलाखतीला सुरुवात झाली. ‘‘मला संगीताची खूपच आवड होती म्हणूनच मी या कलेचा वसा घेतला. वैद्यकीय शिक्षण हे केवळ पोट भरण्याच्या हेतूने मी घेतले होते. माझे मूळ हे पुण्याचे असले तरी, माझी कर्मभूमी हे नाशिक आहे. वयाच्या साठीनंतर मी बदलापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जगन्नाथ बुवा यांच्याकडून प्राथमिक संगीत शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर पुढील शिक्षण सी. आर. व्यास यांच्याकडे घेतले ,’’ असे त्यांनी सांगितले.  माटे यांच्या तरुणपणात ‘खजांची’ नावाचा चित्रपट आला होता. निर्मात्यांनी या चित्रपटातील गाण्यांची स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक लता मंगेशकर यांना मिळाला होता, तर द्वितीय क्रमांक माटे यांना मिळाला होता, असे सांगताच उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नाशिकमध्ये असताना कुसुमाग्रज यांच्या आयुष्यावर बेतलेले अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते, तसेच राम गणेश गडकऱ्यांवरही त्यांनी बरेच कार्यक्रम केल्याचे त्यांनी सांगितले.

‘प. भीमसेन जोशींना पिठले दिले’
पंडीत भिमसेन जोशींनी एका कार्यक्रमानंतर माटे यांच्याकडे जेवायला येतो, असे त्यांना कळवले आणि जेवणात शेवग्याच्या शेंगांच्या पिठल्याची मागणी केली. कारण, त्यांना माटे यांचा स्वयंपाक आवडत असे. पंडीतजींना पिठले हवे म्हणून रात्री १० वाजता माटे यांनी स्वत: झाडावरच्या शेंगा तोडून पिठले केल्याचा प्रसंग सांगितल्यावर रसिकांना टाळयांचा कडकडाट केला.