03 August 2020

News Flash

पं. राम मराठे संगीत महोत्सव उत्साहात

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात विवेक सोनार यांच्या बासरी वादनाने

पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी पं.राशीद खान यांचे स्वागत केले.

संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने पं. हरिप्रसाद चौरसिया सन्मानित

ठाणे : उपस्थितांच्या गर्दीवरून ठाणेकरांचे संगीतावरचे प्रेम लक्षात येते. कलेवर असलेले रसिकांचे हे प्रेम पाहून, माझा पुढील जन्म हा ठाण्यात झालेला मला आवडेल असे मत, पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केले.

ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाटय़परिषद ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २६व्या संगीत भूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, हार्मोनियम वाद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी फेलोशिपचे मानकरी ठरलेल्या अनंत जोशी यांना युवा पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले आहे. या वेळी पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी उपस्थितांशी संवाद साधला. हा तीन दिवसीय महोत्सव ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाटय़गृहात पार पडला.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात विवेक सोनार यांच्या बासरी वादनाने झाली. त्यांना पखवाजवर पंडित शंकर यांनी तर, तबल्यावर पं. रामदास पळसुले यांनी साथ दिली. दुसऱ्या दिवशी शास्त्रीय गायिका दीपा पराडकर-साठे यांनी शास्त्रीय संगीतातील विविध राग उपस्थितांसमोर सादर केले. त्यांनी सादर केलेल्या ‘धानी’ या रागाला रसिकांनी चांगली दाद दिली. तसेच या वेळी ठाण्याच्या कथ्थक नृत्यांगणा श्रद्धा शिंदे यांनी कथ्थक नृत्याचे सादरीकरण करून रसिकांचे मन जिंकले. तर, शास्त्रीय गायिका यशश्री कडलासकर यांनी यमन राग आणि भजन सादर करून या महोत्सवाची रंगत वाढविली. शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांनी रागेश्री या रागाने गायनाला सुरुवात केली. त्यानंतर ‘सय्या फिर याद आये’ आणि ‘का करु सजनी आये ना बालम’ ही ठुमरी रसिकांसमोर सादर केली. त्याचबरोबर, पं. राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला रसिकांची चांगली दाद मिळाली.

संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘वसंत वैभव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गायक पं. विजय कोपरकर आणि पं. सुरेश बापट यांनी पं. वसंतराव देशपांडे यांच्या वैभवशाली संगीताचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. तर, स्वरांगी मराठे आणि प्राजक्ता मराठे यांनी सहगायन उपस्थितांसमोर सादर केले. समारोप गायिका विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. या महोत्सवाला ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 5:17 am

Web Title: hari prasad chaurasia honored with pt ram marathe memorial award zws 70
Next Stories
1 गर्दीच्या वेळी वाहतुकीत अडथळे
2 महिला, बालके शासकीय योजनांपासून दूर
3 मध्य रेल्वे प्रवाशांचे आज आंदोलन
Just Now!
X