सखल भागात पाणी साचल्याने वसईकरांचे जनजीवन विस्कळीत

सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने वसई-विरार शहराला झोडपले असून जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. शहरातील सखल भाग पुन्हा जलमय झाला असून महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा जलभराव झाल्याचा आरोप सामान्य नागरिकांनी केला आहे.

वसईकरांची मंगळवारची पहाटच पावसाच्या जोरदार सरींनी झाली. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी दुपारपासून जोरदार पुनरागमन केले. मंगळवारी सकाळपर्यंत एकूण पावसाची ७५७ मिलीमीटर नोंद झाली. मागील आठवडय़ात पडलेल्या पावसांनी वसईकरांची त्रेधातिरपीट उडवली होती. त्याची पुनरावृत्ती या पावसात झाली. वसई, नालासोपारा, विरार शहरात सर्वत्र पाणी साचले होते. नवघर, वसईच्या बस आगारांमध्ये तळे साचले होते, तर शहरातील मुख्य रस्त्यावरही पाणी साचले होते. गोखिवरे येथील शंकर मंदिरासमोरील रस्ता पाण्याखाली गेला तर बिलालपाडा परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नालासोपारा येथील धानीव बाग, नवजीवन, वालई पाडा या भागातील घरातही पाणी शिरले होते. तुळिंज, मोरे गाव, आचोळे रोड तसेच सेंट्रल पार्क, प्रगतीनगर, विजयनगर येथील ९० फुटी रस्ता, उड्डाणपूल परिसर जलमय झाला होता. विरारच्या मनवेल पाडय़ातील घरातही पाणी शिरले होते.

अंधेरी येथे पूल कोसळल्याने सकाळी लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातून परतावे लागले. अनेक शाळांनी सुट्टी घोषित केल्याने मुले घरी परतली. साचलेल्या पाण्यात छोटी वाहने बंद पडत होती. पाणी काढण्यासाठी पालिकेचे कर्मचारी दिसत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पालिकेची आपत्कालीन व्यवस्था कुठे गेली, असा सवाल नागरिक करत होते. वसई पूर्वेला असलेल्या औद्योगिक वसाहतीत जाणारे  कर्मचारी आणि कामगारांचे हाल झाले. सकाळी सर्वत्र वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. सनसिटी ते गास हा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. बोळिंज जिल्हा परिषद शाळेचा परिसरही पाण्याखाली गेला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सोमवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता.

नालासोपारा येथे समाजमंदिराचे छत कोसळले

मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील राजनगर येथील महापालिकेच्या बहुउद्देशीय समाजमंदिराचे छत मंगळवारी सकाळी कोसळले. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पालिकेची ही बहुउद्देशीय वास्तू दोन वर्षांपूर्वी ७० लाख रुपये खर्चून बांधली होती. त्याचे मोठय़ा थाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र मोठय़ा पावसात त्याचे काम किती निकृष्ट होते हे दिसून आले.

शेतकरी सुखावले

गेल्या आठवडय़ापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते, परंतु सोमवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावले आहेत.

७ ठिकाणी झाडे कोसळली

शहरात दिवसभरात ७ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. झाडांवर अडकलेल्या पक्ष्यांना अग्निशमन दलाने सुखरूप मुक्त केले, असे अग्निशमन विभाग अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले.

वसईतील पाऊस 

  • परिसर पाऊस
  • मांडवी ८९ मिमी
  • आगाशी ५८ मिमी
  • निर्मळ १११ मिमी
  • विरार ९२ मिमी
  • माणिकपूर ७८ मिमी
  • वसई १०६ मिमी