घरे देण्यापूर्वी पोलिसांना माहिती देणे बंधनकारक, अन्यथा गुन्हा दाखल

वसई विरार शहरातील नायजेरियन नागरिकांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी कंबर कसली आहे. नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिकांचे गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहून या नागरिकांना घरे भाडय़ाने देण्यापूर्वी त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आली आहे. तसे न केल्यास स्थानिक नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे. या निर्णयाने शहरातील परदेशी आरोपींची गुन्हेगारी आटोक्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वसई विरारसह मीरा रोड परिसरात मोठय़ा प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. याशिवाय बांगलादेशी नागरिकसुद्धा छुप्या पद्धतीने राहात आहेत. गेल्या काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांचा उपद्रव वाढला आहे. अनेक गुन्ह्य़ात नायजेरियन नागरिकांचा समावेश आढळून येत आहे. अमली पदार्थाचे व्यवहार, ऑनलाइन फिशिंगच्या व्यवहारात या बांगलादेशी नागरिकांचा सक्रिय सहभाग आहे. याशिवाय त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाही धोक्यात येत आहे. गेल्या महिन्यात नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमध्ये जोसेफ नावाच्या एका नायजेरियन नागरिकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने काही नायजेरिअन गुंडांनी पाच ते सहा स्थानिक नागरिकांना जबर मारहाण करत २७ वाहनांची तोडफोडही केली होती. त्यामुळे शहरात अशा असंख्य घटना वाढत चालल्या असून पोलीस ठाण्यातही या गुन्ह्य़ांची संख्या दुपटीने वाढत चालली आहे.

या नायजेरियन नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत होती. शहरात दामदुपटीने भाडे देऊन हे नायजेरियन नागरिक घरे विकत घेत असतात. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून भाडेतत्त्वावर घरे देण्यासाठी नियमावली बनविण्याची विनंती केली होती.

त्यानुसार या नायजेरियन नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी संपूर्ण पालघर जिल्ह्य़ात पुढील दोन महिन्यांकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(२) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. याआधी घरमालक पैशाच्या लालसेपोटी परदेशी नागरिकांची कुठलीही शहानिशा न करता त्याला भाडेतत्त्वावर घर देत होता. मात्र आता तसे चालणार नाही.

घर मालकाला परदेशी नागरिकाला घर, दुकाने हॉटेल व जमीन भाडय़ाने देण्यापूर्वी त्यांची रीतसर भाडे करार करून नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाडय़ाने देऊ नये, असे आदेश पालघर पोलिसांनी दिले आहेत. त्याचसोबत जर यापूर्वीही भाडेतत्त्वावर दिलेली असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असेही आदेश आहेत. तसेच जर स्थानिक नागरिकांकडून या नियमांचा भंग झाल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

या निर्णयाने जिल्ह्य़ात राहत असलेल्या परदेशी नागरिकांचा अधिकृत आकडा पोलिसांच्या हातात येईल. त्याचसोबत जर या नागरिकांकडून अमली पदार्थ, तस्करीसारख्या घटना होत असतील तर पोलिसांना या

आरोपींपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे. तसेच शहरातील गुन्हेगारी आकडेवारी ही कमी होण्याचीही शक्यता आहे.

ही माहिती बंधनकारक

  •  मूळ देश, पूर्ण पत्ता आणि त्याचे पुरावे
  •  स्थलांतरित होण्यामागील कारण
  •  मित्रांची माहिती, समूह छायाचित्र
  •  ज्या दलालमार्फत घर घेतले त्याची सर्व माहिती

पैशाचा लोभ

वसई विरार मीरा रोड परिसर मुंबईच्या लगत असला तरी येथील घरे मुंबईच्या तुलनेत भाडय़ाने अतिशय स्वस्त मिळतात. त्यामुळे नायजेरियन नागरिक दामदुप्पट भाडे देऊन वसई विरारमध्ये घरे घेतात. पैशांच्या लोभापायी घरमालक कागदपत्रे तपासत नाही. या नायजेरियन नागरिकांना अशाच पद्धतीने वाहनेदेखील उपलब्ध होतात.

पालघर जिल्ह्य़ात परकीय नागरिकांना वास्तव्यासाठी भाडय़ाने सदनिका, घर, दुकाने, हॉटेल व जमीन भाडय़ाने देण्यापूर्वी त्यांची रीतसर भाडे करार करून नजीकच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती दिल्याशिवाय भाडय़ाने देऊ नये व यापूर्वी दिलेली असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलीस ठाण्यात द्यावी. – डॉ. कैलास शिंदे, पालघर जिल्हाधिकारी

या निर्णयामुळे परदेशी नागरिक विशेषत: नायजेरियन नागरिकांच्या उपद्रवाला आळा बसणार आहे. नायजेरियन नागरिकांची संपूर्ण माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा वचक बसणार आहे

– विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई