एखादा गुन्हा घडत असेल आणि तुम्ही त्याचे साक्षीदार असाल तर यापुढे तुम्हाला माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्याची पायरी चढायची गरज पडणार नाही. ठाणे पोलिसांनी विकसित केलेल्या ‘होप’ या नव्या मोबाइल अ‍ॅपद्वारे तुम्ही घटनेची माहिती पोलिसांपर्यंत सहजपणे पोहचवू शकता. आसपास घडणाऱ्या घटनेचा व्हिडीओ किंवा फोटो काढून तो अ‍ॅपवर अपलोड करताच अवघ्या काही क्षणात पोलिसांना त्याची माहिती मिळणार असून त्याआधारे पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करता येणार आहे. या अ‍ॅपमुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या महत्त्वााच्या क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ मिळणार असल्याने ते संबंधित आरोपींविरोधात पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यास पोलिसांना मोठी मदत होणार आहे.
वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण या पाश्र्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी ‘होप’ या नावाचे मोबाइल अ‍ॅप विकसित केले असून त्याचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. अनेकदा गुन्हा केल्यानंतर आरोपी पलायन करतात आणि त्या घटनेचे पुरावे गोळा करताना पोलिसांच्या नाकीनऊ येते. मात्र, अनेकजण गुन्हा घडताना त्याचे साक्षीदार असतात. त्यापैकी काहीजण माहिती देण्यास पुढेही येतात. पण, काहीजण पोलीस ठाण्याची वारी पाठीमागे लागेल म्हणून माहिती देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे घटनेची पुरेशी माहिती मिळत नसल्याने त्याचा फायदा आरोपींना होतो. परंतु ‘होप’ या मोबाइल अ‍ॅपवर नागरिकांना एका क्लिकवर घटनेची माहिती पोलिसांना देणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून व्हिडीओ आणि फोटोद्वारे माहिती मिळणार असल्याने त्या गुन्ह्यात आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा होणार आहेत.
दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेशपाठोपाठ ठाण्यात
गुजरात येथील आणंद जिल्ह्य़ातील सिग्निफिकेन्ट सायबर सिक्युरिटी इंडिया या कंपनीने हे मोबाइल तंत्रज्ञान विकसित केले असून ते उत्तरप्रदेश, गुजरात आणि दिल्ली आदी राज्यांतील काही शहरांमध्ये सुरू करण्यात आले आहे. या कंपनीचे काही पदाधिकारी कल्याणमधील व्यापारी पराग जैन आणि भरत जैन या दोघांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे या दोघांनी कंपनीचे पदाधिकारी व ठाणे पोलिसांची भेट घडवून आणली आणि त्यावेळी हे अ‍ॅप शहरात राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. तसेच या अ‍ॅपकरिता सुमारे दोन ते अडीच लाख रुपये खर्च असून सामाजिक उपक्रम म्हणून पराग जैन आणि भरत जैन या दोघा व्यापाऱ्यांनी त्याचा खर्च उचलला आहे.
‘होप’ काय आहे?
’गुगल प्ले स्टोरवरून ‘होप, ठाणे पोलीस’ (hope thane police) या नावाचे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर नागरिकांना नोंदणी करावी लागणार आहे.
’‘होप’ अ‍ॅपमध्ये १४ प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या असून त्यामध्ये इमर्जन्सी मेनू, सेफ्टी टिप्स, पोलीस ठाण्यांची माहिती व क्रमांक, वाहतूक नियम, सायबर सुरक्षा, नागरी सुविधांचे क्रमांक आदीचा समावेश आहे.
’‘शेअर इन्सिडन्स’वर क्लिक करून नागरिकांना घटनेचे फोटो किंवा व्हिडीओ पाठविता येईल.
’या अ‍ॅपवरील मदतीकरिता एका बटणावर क्लिक केले तर त्याची माहिती नियंत्रण कक्षात पोहचते आणि संबंधितांना तातडीने पोलिसांची मदत मिळू शकते.